स्थैर्य, चाफळ (जि. सातारा), दि.२० : शासकीय बांधकाम कंत्राटदारांची बिले थकित आहेत, ती न मिळाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांसह मजुरांची यावर्षीची दिवाळी होऊ शकलेली नाही. ही थकित बिले न मिळाल्यास 25 नोव्हेंबरला कंत्राटदार आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वीच तोडगा निघावा, यासाठी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कंत्राटदार संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी निवेदनाद्वारे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की मागील वर्षापासून जिल्ह्यातील, राज्यातील कंत्राटदारांची बिले शासनाकडे थकित आहेत. जिल्ह्यातील व राज्यातील कंत्राटदारांनी बॅंक पतसंस्थांकडून कर्ज काढून कामे पूर्ण केली आहेत. त्या वेळी शासनाकडून पैसे न मिळाल्याने बॅंकांची पतसंस्थेची व्याज वाढत आहेत. अन्य देणीदेखील देणेही अवघड होऊन बसले आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन हजार 500 कोटी, ग्रामविकास विभागाचे 650 कोटी, नगरविकास विभागाचे दोन हजार 700 कोटी, जलसंपदा विभागाची 271 कोटींची बिले शासनाकडे थकित आहेत.
दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्याची ‘विक्रमी’ कामगिरी; झेंडूतून मिळवले तब्बल साडेपाच लाखांचे उत्पन्न
बिले दिवाळीपूर्वी मिळणे गरजेचे आहे. ती न मिळाल्याने यावर्षी कंत्राटदारांची व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी साजरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्हा व राज्यातील कंत्राटदार ता. 25 नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. या प्रश्नावर तोडगा निघावा, यासाठी शंभूराज देसाई यांनी लक्ष घालावे, बिले मिळवून द्यावीत, अशी कंत्राटदारांची मागणी आहे. निवेदन देण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष पाटील यांच्यासह उपाध्यक्ष संदीप कोळेकर, सचिव युवराज पाटील, प्रशांत मोरे उपस्थित होते.