स्थैर्य, सातारा, दि. 21 :राष्ट्रीय राज्यमार्ग ४७ च्या नवीन सातारा ते कागल रस्त्याच्या सहा पदारीकरणासाठी नागठाणे (ता.सातारा) येथील संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींवर येथील नागरिकांनी हरकत घेतली असून त्यांनी थेट सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना साकडे घातले आहे. ग्रामस्थांनी नुकतेच त्यांना एक निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नुकतेच एका वर्तमानपत्रात राष्ट्रीय राज्यमार्गच्या नवीन सातारा ते कागल रस्त्याच्या सहा पदारीकरणासाठी महामार्गालगतच्या गावातील जमिनी संपादित करण्याची नोटीस जाहीर करण्यात आली. मात्र महामार्गाच्या चौपदारीकरणावेळीच जमीन संपादित केली असून त्यापैकी बरीशीच जमीन विनावापर शिल्लक आहे. नागठाणे हे गाव सातारा जिल्ह्याला व तालुक्याला जवळ असून ते निमशहरी गाव म्हणून ओळखले जाते. या गावाशी परिसरातील बहुतांश गावांचा दैनंदिन संपर्क असून आठवडे बाजाराचे गाव म्हणून हे ओळखले जाते. अतिरिक्त भूसंपादनामुळे येथील बाजारपेठ बाधित होणार असून स्थानिक व्यावसायिक भूमिहीन व बेकार होणार आहेत.
तसेच येथे महामार्गालगतच एक शाळा व महाविद्यालय असून सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पूर्वी या महाविद्यालयाची वीस गुंठे जागा संपादित केली असून पुन्हा वीस गुंठे जागा नव्याने ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थेच्या इमारतीस धोका निर्माण झाला असून परिसरातील ३८ गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर होणार आहे.तसेच या अधिसूचने अंतर्गत येणाऱ्या जमिनींचे मोजणी नकाशे व इतर माहिती संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून ही पहावयास उपलब्ध होत नाही त्यामुळे हे भूसंपादन संशयास्पद वाटत आहे.
तरी या अतिरिक्त भूसंपादनामुळे नागठाणे गावातील व्यावसायिकांना भूमिहीन करणे अन्यायकारक ठरणार असून हे अतिरिक्त भूमीसंपादन करू नये यासाठी पालकमंत्री म्हणून तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संजय शिवाजी साळुंखे, सुखदेव बंडू पवार, अब्दुल इब्राहिम सुतार, घनश्याम कृष्णा ताटे, राजकुमार नारायण बेंद्रे, व अँड. विकास साळुंखे यांच्या सह्या आहेत.