
स्थैर्य, फलटण : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन प्रयत्नशील असून त्याबाबत कामगार आयुक्त कार्यालय प्रसंगी शासनस्तरावर पाठपुरावा करुन कामगारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी बांधकाम कामगार प्रतिनिधी राजकुमार सुतार, रविंद्र गुप्ते, अमोल झेंडे, हिंदुराव गायकवाड, कामगार संघटक कांबळे, प्रा. भीमदेव बुरुंगले, बिल्डर्स असोसिएशन फलटण शाखाध्यक्ष विक्रम झांजुरणे, भोजराज नाईक निंबाळकर, प्रमोद निंबाळकर, राजेंद्र कापसे, रणधीर भोईटे यांच्यासह अन्य सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामगारांच्या पाल्यांना गेली दोन वर्षे शिष्यवृत्ती रक्कम मिळाली नाही, औजारे खरेदी व घरकुल प्रस्ताव प्रलंबीत आहेत, लॉक डाऊन कालावधीसाठी शासनाने मंजूर केलेले प्रत्येकी २ हजार रुपये अनुदान अद्याप अनेकांना मिळाले नाही, गंभीर आजारी असताना उपचारासाठी नियुक्त केलेल्या हॉस्पिटलची यादी मिळावी, किट वाटप प्रलंबीत आहे वगैरे सर्व मागण्यांची आगामी काळात शासनाच्या माध्यमातून पूर्तता करण्याचे आश्वासन यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट शब्दात दिले.
बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून कामगार आयुक्त कार्यालयात संपर्क करुन आठ दिवसात सर्व मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही देतानाच यादी तयार करण्याच्या कामास गती देण्याची ग्वाही विक्रम झाजुरणे यांनी दिली.