जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही – आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२२ । यवतमाळ । आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल.  आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागण्यासाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी १ हजार क्षमतेचे मुलांचे व ५०० क्षमतेचे मुलींची आश्रमशाळा बांधण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय,आदिवासी वसतिगृह भूमिपूजन आणी मुलींचे वसतिगृह लोकार्पण प्रसंगी सांगितले.

पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार प्रा.अशोक उईके, संजीव रेड्डी- बोदकुरवार, आदिवासी अप्पर आयुक्त सुरेश वानखडे, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, नगराध्यक्ष वैशाली नहाटे, आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जाच्या शाळा, चांगल्या सुविधा आणि शिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच आश्रमशाळेच्या इमारती सुसज्ज आणि परिपूर्ण बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे व्यवसाय किंवा नोकरी देण्यासाठी ॲप तयार करण्यात येईल. त्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्या पद्धतीचे व्यवसाय शिक्षण त्यांना देण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण अकॅडमी तसेच खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अकॅडमी तयार करण्यात येणार आहे.

सर्व आश्रम शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाप्रमाणे राबाविण्याचा प्रयत्न असणार आहे. उत्पन्नाच्या आधारे स्मॉल स्केल इंडस्ट्री काढुन त्यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने योजना आखण्यात येत असल्याचेही श्री. गावित यांनी सांगितले. आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी शाळेतच नियमित उपस्थित राहावेत, यासाठी आश्रम शाळेच्या आवारातच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी दिली.आदिवासी बांधवांना  शेतीत चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनतीने शेती करावी, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्यांना पुरविण्यात येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जनगणनेच्या वेळी प्रत्येक आदीवासी बांधवाने त्यांचे नाव नोंदवले जाईल याची काळजी घ्यावी. कारण या माहितीच्या आधारावरच आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तयार होणार आहेत असे श्री. गावित म्हणाले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आश्रम शाळेतील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ई-रिक्षा चे वाटप, दालमील, शेळीपालन, सूक्ष्म सिंचन, वैयक्तिक व सामूहिक वन हक्क पट्टे  लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सामूहिक वन हक्कचा चांगला आराखडा तयार करणाऱ्या गावांनी आराखड्याची प्रत मंत्री महोदयांना सादर केली.

यावेळी प्राध्यापक अशोक उइके आणि संजीव रेड्डी बोदकुरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक याशनी नागराजन यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!