दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
डॉ. प्रसाद जोशी यांचे ‘सुखी जीवनाचा मूलमंत्र’ हे पुस्तक आपल्याला मिळालेला एक प्रसाद आहे, असे समजूनच वाचूयात व सुखी जीवन जगण्यासाठी निर्विकारपणे जगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विद्यावैभव प्रकाशन, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क फलटण व जोशी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ. प्रसाद जोशी यांनी लिहीलेल्या ‘सुखी जीवनाचा मूलमंत्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद जोशी, बकुळ पराडकर, मा. प्राचार्य रविंद्र येवले, बी.बी.एन. फलटण प्रमुख स्वानंद जोशी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत रामराजे म्हणाले, डॉ. प्रसाद जोशी हे आमच्या हक्काचे डॉक्टर आहेत. सुखी कसं रहावं, यावर बोलण्याइतपत मी मोठा नाही. पण मी सुखी राहण्यासाठी कधी काय करावं? याचं मूल्यमापन करतो. राजकारण हे ‘स्ट्रेसफुल’ आहे. मी सुखी आहे की नाही माहीत नाही, पण मी दुःखी मात्र जरूर नाही. डॉक्टरांचे हे पुस्तक म्हणजे आपल्याला मिळालेला एक प्रसादच आहे, असे समजून ते पुस्तक वाचूयात, असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी बकूळ पराडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावर्षी विद्यावैभव प्रकाशन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशन करण्याचा माझा मानस आहे, असे पराडकर यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी बोलताना डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले की, कोरोना काळ हा सर्वांना त्रासदायक ठरला. या काळात मी छोटे-छोटे आरोग्यविषयक लेख तयार केले. यातूनच मला ‘सुखी जीवनाचा मूलमंत्र’ या पुस्तकाची प्रेरणा मिळाली. याचा लाभ विद्यार्थी वयोगटापासून जेष्ठ नागरीक या सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले.
बी.बी.एन. फलटण प्रमुख स्वानंद जोशी यांनी सांगितले की, बी.बी.एन. संस्था महाराष्ट्रात उत्तम कार्य करीत असून छोटे व मोठे व्यावसायिक यांना संघटित करून व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करत आहे. भविष्यकाळात हे कार्य अधिक मजबूत करून सर्व समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सौ. शुभांगी बोबडे यांनी गणेशस्तवन म्हटले. तसेच बारामती बी.बी.एन. प्रमुख श्री. व सौ. सामंत यांचा सत्कार श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उस्मान शेख यांनी मानले.
या कार्यक्रमास डॉ. अवधूत व डॉ. हेमलता गुळवणी, डॉ. महेश बर्वे, डॉ. माधुरी दाणी, बाळासाहेब शेंडे, श्रीमती जयश्री जोशी, अरुण भोईटे, डॉ. धायगुडे, बी.बी.एन. फलटण सभासद, डॉ. जोशी हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.