
दैनिक स्थैर्य । दि.०९ एप्रिल २०२२ । सातारा । महाबळेश्वर, कोयना बॅक वॉटर येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. आगामी काळात या भागातील पर्यटन आणखी वाढावे, या उद्दिष्टाने विकास साधला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाबळेश्वर हे संपूर्ण जगातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. महाबळेश्वर शहरातील बाजारपेठेचा एका वेगळ्या पद्धतीने विकास केला जाणार आहे. त्यातून स्थानिक व्यवसायिकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. महाबळेश्वरला ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी अनेक ब्रिटीशकालीन इमारती आहेत. विशेषतः अनेक इमारती या शासनाच्या ताब्यात देखील आहेत. त्यांचा ऐतिहासिक बाज तसाच ठेवून पर्यटनाच्या अनुषंगाने विकास केला जाणार आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व कामे केली जाणार असून यासाठी १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
स्ट्रॉबेरी वर्टीकल गार्डन, पॅटीस लायब्ररी अशी काही नवीन संकल्पना असलेली कामे आपण या ठिकाणी करणार आहोत. या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. पावसाळ्याची काही कामे करता येतील, ती सुरू केली जाणार आहेत. महाबळेश्वरमध्ये अनेक दुर्लक्षित बाबी आहेत. या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. त्यांचा देखील विकास केला जाणार आहे. महाबळेश्वरमधील पार्किंगची व्यवस्था सुधारण्यात येणार असून तीन-चार मजली पार्किंग व्यवस्थेची सोय देखील केली जाणार आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधान विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी देखील हिरीरीने या कामासाठी पुढाकार घेतलेला आहे.
जिल्ह्यामध्ये अनेक धरणे आहेत, यामध्ये कोयना, कन्हेर आणि धोम या धरणांमध्ये वॉटर स्पोर्टसाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने निर्णय घेतला. या तिन्ही ठिकाणी सर्वे करण्यात आला होता. तज्ञ मंडळींनी कोयना वॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्स हा प्रकल्प राबविण्याचा सल्ला दिला. याठिकाणी स्कुबा डायविंग सारखे प्रकल्प राबवले जाणार आहे, त्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना तारकर्ली येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये आपत्तीच्या घटना गंभीर स्वरूपात घडतात. पावसाळ्यात अनेकदा एनडीआरएफचे पथक बोलण्याशिवाय पर्याय राहत नाही मात्र प्रत्येक वेळी एनडीआरएफचे पथक वेळीच उपलब्ध होईल, याची खात्री नाही तसेच भविष्यामध्ये अनेक अडचणी वाढू शकतात. हे लक्षात घेऊन साताऱ्यातील तरुणांनाच प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांचा वापर आपत्ती काळामध्ये केला जाणार आहे. येथील विकास कामासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.
बायोडायव्हर्सिटी टिकवुन विकास कामे
जिल्ह्यातील कोयना, महाबळेश्वर परिसर इको सेँसिटीव्ह झोनमध्ये येतात. या परिसरातील बायोडायव्हर्सिटी टिकून विकास कामे केली जाणार आहेत. या भागातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिक जनतेला देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होऊ शकतो.