स्थैर्य, मुंबई, दि.०५: ०१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीची शेवटची मात्रा घेतल्यानंतर २८ दिवसापर्यंत त्यांना रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याकडे रक्तदात्यांचा कल कमी होईल व राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्याची रक्तसाठ्याची परिस्थिती बघता राज्यात ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. म्हणून संभाव्य परिस्थिती बघता कोविड – १९ प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा भासतो. आता रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात असल्याने अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता आहे. त्यातच कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवसापर्यंत रक्तदान करता येणार नसल्याने दुहेरी संकट निर्माण होणार आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.