
![]() |
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेले उमेदचे कंत्राटी कर्मचारी. |
स्थैर्य, सातारा, दि.२३: कोरोना महामारीच्या काळातही जीव धोक्यात घालून शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार्या उमेद जिल्हा अभियानात कार्यरत असलेल्या मानधनी कर्मचार्यांवर आता कपातीची टांगती तलवार आहे. याबाबत शासनाने काढलेले 10 सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करावे, अशा मागणीसाठी सर्व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी व अधिकारी 2013-2014 पासून आजअखेर राज्याच्या कानाकोपर्यात केंद्र शासनाच्या मिशन अंत्योदय योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे जीवनात समृद्धी आणण्यासाठी कार्यरत आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकार्यांनी ग्रामीण भागातील गरीब वंचित घटकांच्या महिला सदस्यांचे समुदाय संस्था स्थापन करून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल विकास योजना, महिला किसान सशक्तीकरण परियोजना, अस्मिता प्लस योजना, आमदार आदर्श ग्राम योजना, ग्रामीण आर्थिक परिवर्तन कार्यक्रम, जीपीडीपी अर्थात सबकी योजना सबका विकास योजनेत मिशन अंत्योदय सर्वेक्षण करणे, गरीबी निर्मूलन आराखडा तयार करणे आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समर्पित सेवाभावी पद्धतीने चोख भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या भीषण संकटातही उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून समुदाय संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून कापडी मास्क निर्मिती, अन्नधान्य भाजीपाला दूध आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी जेवण व अन्य सुविधा पुरवणे, आदी अत्यावश्यक सेवेच्या अनुषंगिक महत्वपूर्ण जबाबदार्या पार पाडत आहोत.
असे असताना राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी सामाजिक अस्थिरतेच्या कचाट्यात सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत. या परिपत्रकामुळे अनेकांना आपली रोजगाराचे साधन हिरावून घेतले जाण्याची भीती वाटू लागली आहे. यामुळे या सर्व कर्मचार्यांची मानसिक अवस्था अस्थिर बनली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रोजगाराच्या परिस्थितीचे अवलोकन करता या परिपत्रकामुळे उमेद कंत्राटी कर्मचारी सामाजिक समस्येचे बळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविक, उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती अभियान मनुष्यबळ पुस्तिकेतील पात्रतेचे निकष पूर्ण करणार्या उमेदवारांमधून राज्यस्तरीय एक सामायिक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व मुलाखतीतून निवड करून झाली आहे. उमेद कंत्राटी कर्मचार्यांनी ग्रामीण भागात समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका, बॅक सखी, आर्थिक साक्षरता सखी यांच्या माध्यमातून गोरगरीब वंचित घटकांना संघटित करून त्यांच्या संस्था बांधणी करून त्याचे क्षमतावृद्धीच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अजूनपर्यंत पोहोचवून या योजनांचे उद्देश सफल करण्यासाठी बहुमोल योगदान दिले आहे. तसेच या जागतिक महामारीच्या काळात ही न डगमगता स्वतः फिल्डवर कार्यरत राहून अत्यावश्यक सेवेच्या अनुषंगाने येणार्या महत्वपूर्ण जबाबदार्या सक्षमपणे पार पाडल्या आहेत. या सर्व बाबींचे साक्षीदार उच्चपदस्थ अधिकारी आहेतच त्याचबरोबर याचा लाभ मिळालेले समाजातील वेगवेगळे घटकही आहेत. त्यामुळे संबंधित परिपत्रक रद्द व्हावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.