दैनिक स्थैर्य | दि. १ ऑटोबर २०२३ | फलटण |
राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मुंबई येथे अशा वृत्तपत्र संपादकांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.
राज्यातील वृत्तपत्रे व पत्रकारिता क्षेत्रात सहकारी तत्त्वावर एकमेव कार्यरत असणार्या ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघा’ची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा फलटण (जि. सातारा) येथे बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर (नांदेड), संचालक दिलीपसिंह भोसले (फलटण), रमेश खोत (जालना), माधवराव पवार (कंधार), बाळासाहेब आंबेकर (सातारा) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बेडकिहाळ म्हणाले, लघु व मध्यम वृत्तपत्र संपादकांसह पत्रकारांपुढे जाहिरात दरवाढ, वृत्तपत्र पडताळणीतील जाचक अटी, अधिस्वीकृती पत्रिका वितरणाची मर्यादा, जाहिरात धोरणाची पायमल्ली, ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका व सन्मान निधी मिळण्यात येणार्या अडचणी, आरोग्य सुविधा असे असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांवर संस्था सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र, यावर व्यापक प्रमाणावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी अधिवेशन मुंबई येथे आयोजित केले जाईल, असे सांगून वृत्तपत्रांसह डिजीटील मिडीयातील संपादक व पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल अशी ‘पत्रकार कार्यशाळा’ फलटण येथे आयोजित करणार असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
सभेदरम्यान बोलताना, वृत्तपत्रांच्या पडताळणीतील जी.एस.टी. संबंधीची अट अन्यायकारक आहे. संपादकांनी याचा विरोध करणे आवश्यक असून संस्था स्तरावर केंद्र व राज्य सरकारकडे याविषयी निवेदन देण्यात यावे, असे कृष्णा शेवडीकर यांनी सूचित केले. संस्थेने ध्येय-उद्देशांप्रमाणे वृत्तपत्रांच्यासंबंधी व्यवसाय वृद्धीच्या दिशेने प्रयत्न करून नफा प्राप्तीचा प्रयत्न करावा. तसेच फलटण येथील पत्रकार कार्यशाळा आयोजनास महाराजा मल्टीस्टेट सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिलीपसिंह भोसले यांनी दिली. तर ज्येष्ठ पत्रकारांकरिता अधिस्वीकृती पत्रिका नूतनीकरणाची अट शासनाने रद्द करावी, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेकर व रमेश खोत यांनी व्यक्त केली.
सभेदरम्यान झालेल्या चर्चेत ज्येष्ठ सदस्य शामराव अहिवळे, संचालक सौ. अलका बेडकिहाळ, बापूराव जगताप, अॅड. रोहित अहिवळे, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, विशाल शहा, मयुर देशपांडे, उमेश गुप्ता यांनीही सहभाग घेत आपल्या सूचना मांडल्या.
प्रारंभी संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व. आर. वाय. जाबा (छ.संभाजीनगर) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार परीक्षण समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांचा तर महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कृष्णा शेवडीकर यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी केले. रोहित वाकडे यांनी आभार मानले.