कोरोनाकाळात माणुसकीच्या भावनेतून सामूहिक जबाबदारीने काम करावे ; बाधितांची संख्या कमी न झाल्यास, लॉकडाऊन अटळ – पालकमंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि २८: कोरोनाकाळात सर्वांनी माणुसकीच्या भावनेतून व सामूहिक जबाबदारीने काम करावे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाबधितांची संख्या अशीच वाढत राहिल्यास येत्या काही दिवसात लॉकडाऊन अटळ आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्याच्या झालेल्या कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलात होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, येवला प्रांतधिकारी सोपान कासार, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत खैरे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद पाटील, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गृहवीलगीकरणात असणाऱ्या रूग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहवीलगीकरणातील रूग्णांची घरात नियमांनुसार व्यवस्था नसेल अशा रुग्णांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे. जेणेकरून त्या रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग पसरु नये यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

खाजगी डॉक्टरांकडून कोरोनाबधित रूग्णांवर उपचार करण्यात येत असतील तर त्याची देखील नियमित माहिती प्रशासनास देण्याबाबत खाजगी डॉक्टरांना कळविण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे तेथे प्रतिबांधित क्षेत्र जाहीर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

व्यवसायिकांनी व्यवसाय करतांना गर्दी वाढणार नाही याचे भान ठेवून लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. गर्दीच्या नियोजन व नियंत्रणासाठी प्रशासनाने पोलिसांचे सहकार्याने कार्यवाही करण्यात यावी.पोलिसांनी लग्नसोहळ्याना परवानगी देताना तेथे नियमांचे पालन होते आहे हे पाहण्यासाठी लग्नसोहळ्याच्या ठिकाणी एक-दोन पोलिसांची नेमणूक करावी.
निर्देश पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

येवला व निफाड या दोन्ही तालुक्यात लसीकरण वाढविण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. जेणे करून लसीकरणाची मोहीम राबविताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि सर्वांचे वेळेत लसीकरण पूर्ण होईल, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

येवला व निफाड प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती पालकमंत्री यांना दिली.

तालुक्यातील ज्या गावांचा पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असतील त्यावर तातडीने काम करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना टंचाईचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!