अबब… वडूजमध्ये महिलेला रिक्षात ऑक्सिजन लावण्याची वेळ; ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वडूज, दि. १३: येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने आज येथे कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच रिक्षामध्येच ऑक्सीजन लावण्याची वेळ आली.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, येथील ७५ वर्षीय एक वृद्ध महिला आज सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची ऑक्सीजन लेवलची तपासणी केली असता ती कमी होती.

त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटर बंद होते. आजपासून ते कार्यान्वीत करण्यात येणार होते. त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही. शिवाय ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्या ठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतर महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी
कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱ्याला नेले.

या घटनेची चर्चा आज वडूज शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरोना बाधित रूग्णांना शासकीय कार्यालयांत आणून दाखल करू : विजयकुमार शिंदे
प्रशासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध करून कोरोनावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने येथील कोव्हिड सेंटर सुरू करावे अन्यथा कोरोना बाधित रूग्णांना शासकीय कार्यालयांत आणून दाखल करू, असे मत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!