दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुन २०२२ । फलटण । वातावरणीय बदलांचे गंभीर परिणाम आता जगभरातील नागरिक अनुभवत आहेत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा विविध आपत्तींमुळे शासनाला हजारो कोटी रूपये नुकसान भरपाईसाठी खर्च करावे लागत आहेत. या आपत्तींची कारणे वेगवेगळी असली तरीही याचे मूळ हे वातावरणीय बदलांमध्येच आहे, हे निश्चित. यामुळे होत असलेले दुष्परिणाम भविष्यात अधिक गंभीर होत जाण्याची शक्यता आहे. ते कमी करण्यासाठी हा विषय गंभीरपणे हाताळणे गरजेचे आहे. हे बदल रोखण्यासाठी प्रत्येक गावात, वस्तीवर व घरोघरी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनच करणे हीच काळाची गरज आहे, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पर्यावरण दिनानिमित्त व्यक्त केले.
हवेचे व ध्वनीचे वाढते प्रदूषण, मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आदींमुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. शुद्ध हवा ही आजची निकड आहे. ही निकड पूर्ण होण्यास प्रत्येक घराने व घरातील प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनच करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांनी निश्चितच हातभार लागेल. त्याचबरोबर वायू आणि ध्वनी प्रदूषणही कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. विकास हा महत्त्वाचा आहेच, पण तो शाश्वत आणि पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे, हा मुख्य उद्देश ठेवुन सर्वांनी कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
वातावरणीय बदलांना मानव देखील जबाबदार आहे. त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेच. तथापि, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता ‘आज नाही तर कधीच नाही..’ या भावनेतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे. गेली दोन वर्षे महामारीकाळात स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाचं महत्त्व कधी नव्हे इतकं लक्षात आलं आहे. जागतिक तापमानवाढ हा मानवजातीसमोरील सर्वाधिक मोठा धोका आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरूवात देखील केली आहे. पर्यावरणात प्रदूषित घटकांची वाढ होत आहे, जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणूनच ज्या पृथ्वीशिवाय आणि पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही ते पर्यावरण निकोप राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, याबाबतची जागृती या दिवसाच्या निमित्ताने केली जाणे गरजेचे आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.