अत्यावश्यक सेवा सुरू , पोलिसांचा कडक पहारा ,घंटा गाडय़ा प्रत्येक वार्डात कचरा गोळा करण्यासाठी
स्थैर्य, सातारा, दि. १९ : सातारावासीयांनी स्वतः ओढवून घेतलेली टाळेबंदीचा तिसरा दिवशी कडक होता. शहरात सकाळपासून अगदी पोवई नाक्यापासून राजवाडा ते समर्थ मंदिर परिसरात रस्ते सूनसान दिसत होते. विनाकारण कोणी बाहेर पडू नये म्हणून सातारा शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस यांची शहरात गस्त सुरू होती. मोबाईल पथके भिंगरी लावून गस्त घालत होती. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या राउंड टाकत होत्या. शहरात अत्यावश्यक सेवा म्हणून बँक, मेडिकल आणि गॅसचे कार्यलय सुरू होते. सकाळी एका मटण विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरासह जिह्यात वाढत चाललेल्या करोना बाधितांच्या रुग्ण संख्येला कोठेतरी ब्रेक लागावा म्हणून सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि.17 पासून पुन्हा लॉकडाऊन लागू केले आहे. लॉकडाऊनचा तिसरा दिवस सातारा शहरात एकदम कडक पाळण्यात आला. बहुतांशी पेठेतले नागरिक हे घराबाहेर पडले नाहीत. घरातूनच बाहेर काय घडामोडी सुरू आहेत यावर लक्ष ठेवून होते. शहरात येणाया मुख्य रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. संचारबंदी असल्याने कोणीं भाजी विक्री व इतर विक्री करण्याचे आणि विकत घेण्याचे कोणी सातारकर धाडस करत नव्हते. शहरातील राजपथ, राधिका रोड आणि पोलीस मुख्यालय रोड हे तिन्ही रोडवर चिट पाखरू नव्हते. काही टुकार नागरिक बाहेर येताना दिसताच त्यांना पोलीस परत घरी पिटाळून लावत होते. अतिशय कडक नियम पाळले जात असल्याचे दिसत होते.
शहरात कोणीही बाहेर विनाकारण फिरू नये यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात पोवई नाका, कमानी हौद, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, राधिका सिग्नल, आर.के.बॅटरी, शिवराज तिकाटने, खेड फाटा, अजंठा चौक आदी 13 ठिकाणी खडा पहारा आहे. तसेच शहर पोलिसांच्या सहा मोबाईल पथके शहरात ठिकठिकाणी गस्त घालत आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संतोष शितोळे यांनीही सकाळपासून त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवली आहे. पोलीस जवानांना नेमून ठिकाणे दिली आहेत. त्यामध्ये समर्थ मंदिर, बोगदा, मोळाचा ओढा, जुना आरटीओ ऑफिस चौक, भु विकास बँक चौक, वाढे फाटा, मोती चौक या ठिकाणी बंदोबस्त दिसत होता. तसेच या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या स्वतः राउंड मारत होत्या.
शहरात नागरीकांना टाळेबंदीत महत्वाचे म्हणजे मेडिकल स्टोअर्स, गॅस एजन्सी ही त्यांना दिलेल्या वेळेत त्यांचे शटर सुरू होते. नागरिकांना सेवा दिल्या जात होत्या. त्याबद्दल सातारकर नागरिकानी समाधान व्यक्त केले. शहरात कडक लॉक डाऊन सुरू असताना ही कुरेशी मटण शॉप उघडून दुकान सुरू ठेवले होते. पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने पोलिसांना पाहताच त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. शहरातील पालकांना लॉक डाऊन कधी उठेल तेव्हा उठेल पण आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन चालणार नाही, याचीच काळजी बहुतांशी पालक घेत आहेत. त्यांची मुले मोबाईलवर ऑन लाईन धडे घेण्यात दंग असल्याचे चित्र दिसत होते. पालक घरातच इतर कामे करण्यात मग्न दिसत होते. सगळे शहरवाशीय घरातून बाहेर पडले नाहीत. परंतु शहरात दररोज गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी सातारा पालिकेच्या घंटा गाडय़ा प्रत्येक वार्डात कचरा गोळा करण्यासाठी फिरत होत्या. कचरा टाकण्यासाठी तेवढे नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते.