दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण | भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत असतानाच त्यांच्या या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे.
स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारा हा उपक्रम आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. 9 ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनी करण्यात आला आहे. संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शिलाफलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन, पंच प्रण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमांतून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्व नगर परिषदा, नगर पंचायतीत व 563 ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात येत आहे.
ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मरण करण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांनी मिळालेले स्वातंत्र्य अखंड, अबाधित ठेवण्यासाठी प्राण खर्चिले, त्यांना सलाम, वंदन, प्रणाम करण्याचा, त्यांच्याप्रती नतमस्तक होण्याचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी या माध्यमातून देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट, 2023 पासून दि. 14 ऑगस्ट, 2023 पर्यंत कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
शिलाफलक : हिंगोली जिल्ह्यात एकूण 563 ग्रामपंचायती असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यांसाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तीची नावे निश्चित करुन शिलाफलकाची उभारणी अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी करण्यात येत आहे.
वसुधा वंदन : वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपाची लावगड करुन अमृत वाटिका करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायत अंतर्गत अमृत सरोवर असलेल्या गावातील जागा, परिसर निश्चित करुन आमृत वाटिका तयार करण्यात येत आहेत.
स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा (स्थलसेना, नौसेना, वायुसेना तसेच पोलीस दल), स्वातंत्र्य सैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी शाल, बुके, श्रीफळ देउुन सन्मान करावा. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतींना कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार स्वातंत्र्य सैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान गावपातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते सन्मान करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचप्रण (शपथ घेणे) : जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी क्रांती दिनी हातात दिवे लावून पंच प्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम जिल्हाभर साजरा करण्यात आला. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
ध्वजारोहण : गावक्षेत्रातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत या एका योग्य ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकाविण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घेण्यात येणार आहे.
अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून अभियान अनुषंगिक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानात जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून, नागरिक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. या कृतीतून भारताला विकसित देश बनविणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता व बंधुता टिकवून ठेवणे, आदर्श नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्याप्रती आदर व्यक्त करणे असे अनेक हेतू आहेत.
भारतीय स्वातंत्र्याची गाथा भावी पिढीला माहिती व्हावी यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना व नागरिकांना सहभागी करुन घेतल्यामुळे प्रत्येकाला हे अभियान आपलसं वाटणारं आहे.