सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.०५: सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक अनुप शहा यांच्या नेतृत्वाखाली गेली काही वर्षे समाजातील ज्यांची इच्छा आहे, भक्ती आहे, भावना आहे परंतू आर्थिक किंवा शारीरिक असमर्थतेमुळे ते तीर्थयात्रा करु शकत नाही अशांना तीर्थ यात्रा करवून सुखरुप घरी पोहोच करण्याचे काम सुरु आहे. यावर्षी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजराथ, कर्नाटक राज्यातील 108 अंध, अपंगांना या उपक्रमात सामील करुन घेऊन त्यांना सम्मेद शिखर यात्रा घडविण्याचे महान पुण्यकर्म अनुप शहा व त्यांच्या सहकार्‍यांनी केले ही अत्यंत प्रेरणादायी आणि भगवान महावीरांचा संदेश तंतोतंत अंगीकारल्याची घटना मानावी लागेल.

एकूण 400 लोकांच्या या यात्रेत 108 अंध अपंगांचा समावेश होता, त्यामध्ये राजस्थान मधील 7, गुजराथ मधील 5, कर्नाटक मधील 12 आणि महाराष्ट्रातील 86 जण होते.

या 108 अंध अपंगांमध्ये 12 जण 100 % अंध होते या सर्वांना फलटण ते सम्मेद शिखर यात्रा करविताना स्वतः अनुप शहा व त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेली मेहनत निश्‍चित प्रेरणादायी आहे, तथापी त्यापेक्षा ज्या अंध अपंगांना आपले दैनंदिन जीवन व्यतीत करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो ही मंडळी एवढ्या दूर अंतरावरील आणि विशेषतः पहाडावरील तीर्थक्षेत्री जाऊन भगवंताचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात ही भावनाच प्रेरणादायी आहे.

ज्यांना सरळ रस्त्याने उभे राहुन चालता येत नाही, ती मंडळी डोंगरावरील तीर्थक्षेत्री शेकडो पायर्‍या चढून जाताना कसलाही, कोणाचाही आधार न घेता सर्व पायर्‍या स्वतः चढून जातात, भगवंताचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात, इतकेच काय या 108 अंध अपंगांमध्ये 12 जण पूर्ण अंध असताना एकमेकांच्या सहाय्याने डोंगर चढून मंदिरा पर्यंत पोहोचतात आणि आपण भगवंताला पाहु शकत नसलो तरी त्याच्या दारापर्यंत पोहोचून इतरांच्या तोंडून त्याची महती घेऊन त्याचे आशिर्वाद घेऊ शकलो हे खूप झाले ही भावना ठेवतात.

या जगात सर्व सुख समाधान लाभले तरी भगवंताशिवाय सर्व काही कमीच असल्याची भावना व्यक्त करताना ज्यांच्याकडे सर्व काही आहे ती मंडळी कोणालाही काही न सांगता सोने, चांदी, रोकड असा कोट्यवधींचा ऐवज विविध देवस्थानात दान पेटीत गुपचूप टाकून हे सर्व उपयोगाचे नाही भगवंता तूच हवास ही भावना व्यक्त करीत संपत्तीचा एक प्रकारे त्यागाची भावना व्यक्त करतात तर या अंध अपंगांना आम्हाला सोने, चांदी, पैसा नसला तरी तूच आमचे सर्वस्व आहे ही भावना व्यक्त करण्यासाठी प्रसंगी लंगडत, खुरडत, लोळतही भगवंता पर्यंत पोहोचण्यात धन्यता मानतात, दोघांची स्थिती वेगळी असली तरी भावना परमेश्‍वर दर्शन ही एकच आहे.


Back to top button
Don`t copy text!