‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य प्रा. डॉ. एन. जी. नार्वे यांनी दिली आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’चे नवनियुक्त प्राचार्य म्हणून प्रा. डॉ. एन. जी. नार्वे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत समारंभावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून आजपर्यंत ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी उत्तम दर्जाचे तंत्रशिक्षण घेऊन विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत असताना दिसून येतात. तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत. महाविद्यालयाची ही परंपरा प्राचार्य म्हणून पुढे चालवताना या महाविद्यालयातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार आहे.

विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे हित जोपासण्याचे काम फलटण एज्युकेशन सोसायटीने नेहमीच प्राधान्याने केले असून यापुढेही असेच चांगले काम करत रहाणार असल्याचे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य हेमंत रानडे, डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य (गुंगा), शिरीष दोशी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, राजीव नाईक निंबाळकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मिलिंद नातू, विभागप्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. एन. जी. नार्वे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!