
दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२३ । फलटण ।
अबॅकस हे केवळ गणित अभ्यासाचे तंत्रज्ञान नाही, तर याच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा मेंदू अधिक तल्लख होऊन विद्यार्थ्यांमध्ये अनेकविध गुण विकसीत होतात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असल्याचेप्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले.
येथील सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून आयडियल प्ले अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा १६ वा बक्षीस वितरण समारंभ नुकताच महाराजा मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन अरविंद मेहता बोलत होते. यावेळी प. पू. गोविंद महाराज उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, प. पू. महंत नरेंद्र शास्त्री, ब्रिलियंट अकॅडमी स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, डॉ. दीपा आगवणे, सेंद्रीय शेतीचे प्रणेते कृष्णाथ फुले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांना बाराखडी, पाढे पाठ करणे अनिवार्य असे तो अभ्यासाचा एक भाग असला तरी त्यातून बुध्दीकौशल्य विकसीत करणे, मेंदू तल्लख ठेवण्याची संकल्पना होती, त्याप्रमाणे अबॅकस तंत्रज्ञानातून मेंदू अधिक प्रगल्भ ठेवण्याचा प्रयत्न असून त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित सुधारेल असे सांगताना संगणक किंवा कॅलक्युलेटरच्या माध्यमातून गणित किंवा गणिती बेरीज, वजाबाकी, गुणाकार अचूक येतील पण मेंदूला कसलीही चालना, प्रेरणा मिळणार नसल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.
शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या पहाता सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून त्यापैकी केवळ ६०० विद्यार्थी हे तंत्रज्ञान आत्मसात करतात ही बाब समाधान देणारी नाही, शहरातील विविध संस्था चालकांसमोर हे तंत्रज्ञान ठेवून समजावून दिले पाहिजे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसीत करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत आपल्या संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती त्यांना केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना, फलटण मध्ये गुणवत्तेची परंपरा वाढविणेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबरोबर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे मत अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर म्हणाले, विविध माध्यमामुळे आज जग छोटे झाले आहे, विद्यार्थ्यांना सर्व माहिती सहज मिळू शकते, पूर्वी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पालक सर्व काही होते परंतू आता विद्यार्थी स्वतः निर्णय घेऊ शकतात, स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकतात ही वस्तुस्थिती आहे, तथापि पालक व विद्यार्थी यामध्ये समन्वय असला पाहिजे. अबॅकस सारख्या तंत्रज्ञानाचा अभ्यास व सातत्याने सराव करुन शिक्षण क्षेत्रात आपले नाव, गावाचे नाव व देशाचे नाव मोठे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी सौ. प्रियदर्शनी भोसले, प्राचार्या सौ. नाजनीन शेख, प्राचार्या सौ. संध्या फाळके, पालक सौ. निंबाळकर व सौ. बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ. कल्पना जाधव यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत अबॅकसचे महत्त्व पटवून देऊन, विद्यार्थी कोणतेही साधन न वापरता झटपट गणिताचे उत्तरे कशी देतात हे प्रात्यक्षिकासह दाखविले. यावर्षी राष्ट्रीयस्तरावर अबॅकस स्पर्धेमध्ये फलटण सेंटरचा निकाल १०० टक्के लागला असून २ विद्यार्थ्यांची चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणून निवड झाल्याचे सौ. कल्पना जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या फाळके, मुधोजी प्रा. विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे, स्व. शीलादेवी प्रा. विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा काकडे, महादेव जाधव यांच्या सह पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ. सुनीता जाधव, सौ. पद्मजा जंगम, सौ. सारंगा यादव, सौ. रेखा खिलारे, सौ. पूजा गुळसकर व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या राजवीर धीरज कचरे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. प्रा. सतीश जंगम यांनी सूत्रसंचालन आणि समारोप व आभार प्रदर्शन सौ. रेखा खिलारे यांनी केले.