
दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । दुकान बंद करून घरी निघालेल्या सराफ व्यावसायिकाच्या डोक्यात दांडके मारून त्यांच्या काखेला अडकवलेली बॅग तिघा चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवार, दि. ८ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास समर्थ मंदिरजवळील गोविंद नगरी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली. याबाबतची फिर्याद ज्योती पारखी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय पारखी वय ६५, रा. यादोगोपाळ पेठ, गोविंद नगरी अपार्टमेंट, सातारा यांचे शनिवार पेठेमध्ये सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साठेआठ वाजता दुकान बंद करून धनंजय पारखी व त्यांची पत्नी ज्योती पारखी हे दुचाकीवरून घराजवळ पोहोचले. पार्किंगमध्ये गाडी लावत असतानाच तिथे तीन युवक आले. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यातील एका युवकाने पारखी यांच्या डोक्यात दांडके मारले तर इतर दोघांनी त्यांच्या खांद्याला अडकवलेली बॅग हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. हे चोरटे समर्थ मंदिरहून बोगद्यामार्गे निघून गेले. पारखी हे सराफी व्यावसायिक आहेत. हे चोरट्यांना नक्कीच माहित असणार. त्यांच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी हा डाव साधला. मात्र, पारखी यांच्या पिशवीमध्ये कागदपत्र, दुकानाच्या चाव्या व्यतीरिक्त काहीच नव्हते. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात दांडक्याने मारल्याने धनंजय पारखी हे बेशुद्ध पडले होते. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करत आहेत.