
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । अकलूज । सूर्यकांत भिसे । आषाढी वारी तोंडावर आली असताना पालखी सोहळ्यातील अडचणी काही संपताना दिसत नाहीत . चैत्री वारीपासून संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे विश्वस्थ व मानकरी यांच्याकडून एका महिन्यात तीन वेळा या मार्गाची पाहणी झाली . परंतु प्रशासनाकडून मात्र या मार्गाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पायी दिंडी पालखी सोहळा बंद होता . तो आता शासनाने पायी वारीला परवानगी दिल्याने सुरु होत आहे .
केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्रालयाने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी मोठा निधी दिला आहे . पालखी मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या व रहिवासी नागरीकांच्या जमिनी , जागा , इमारती जात आहेत त्या शेतकऱ्यांना व नागरीकांना नुकसान भरपाई देण्याचे काम जवळपास ८० टक्के पुर्ण झाले आहे .
ज्यांच्या काही तक्रारी आहेत ते वगळता सर्व लाभधारकांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा केल्याचे प्रांत कार्यालयाने सांगितले आहे. पालखी मार्गावरील पुलाची कामे , अतिक्रमणे , पालखी तळ , रिंगण , धावा , भारुड , विसावा आदी ठिकाणच्या अडचणी अद्यापही कायम आहेत . राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक केशव घोडके यांनी महसूल व पोलिस प्रशासनाला पत्र देवून पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सहकार्य करण्याची मागणी केली आहे .
या दोन्ही विभागाकडून सहकार्य झाल्यास पालखी मार्गाचे काम वेळेत पुर्ण होइल असे ते म्हणाले . धर्मपुरी , मांडवे , सदाशिवनगर , माळशिरस , खुडूस व वेळापूर येथील कामाला गती देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २० जूनला तर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा २१ जूनला आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत आहे . हे दोन्ही पालखी सोहळे दि . ४ व ५ जुलैै रोजी माळशिरस तालुक्यात प्रवेश करणार आहेत . त्यापूर्वी पालखी मार्गाचे काम तसेच पालखी तळ , रिंगण , धावा , भारुड व विसावा स्थळाची कामे पूर्ण व्हावीत अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानचे विश्वस्थ डॉ अभय टिळक यांनी केली आहे.
डॉ टिळक , मालक बाळासाहेब आरफळकर, दिंडी समाजाचे सचिव मारूती कोकाटे, बाळासाहेब रणदिवे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर , मुख्य सुपरवायझर ज्ञानेश्वर पोंदे, अवचट, जाधव , पालखी महामार्गाचे प्रकल्प संचालक केशव घोडके , अकलूजचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समीनदर , तहसीलदार जगदीश निंबाळकर, अकलूज उपविभागाचे पोलिस उप अधीक्षक बसवराज शिवपूजे , दिपकसिंह पाटणकर यांच्यासह शासकीय अधिका-यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली व अडीअडचणी बाबत चर्चा केली.