दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । लोणंद । लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाठार बुद्रुक ता खंडाळा गावानजीक असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रातील वाळू चोरीप्रकरणी तीन जणांना खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तीन वर्ष साधी कैद व प्रत्येकी १० हजार रुपये दंड सुनावला आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली माहिती अशी कि लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील वाठार बुद्रुक ता खंडाळा गावच्या हद्दीमधील नीरा नदीच्या पात्रात वाळू चोरी होत असल्याची माहिती लोणंद पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार लोणंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी लोणंद पोलीस कर्मचाऱ्यांसहित संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी दिपक वाघ,रोशन थोपटे,स्वानंद जगताप हे वाळू चोरी करीत असल्याचे लोणंद पोलीसांच्या निदर्शनास आले होते.
यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनला वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार डोंबाळे यांनी करीत दोषारोपपत्र खंडाळा येथील न्यायालयामध्ये दाखल केले होते.
त्यानुसार खंडाळा न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांच्यासमोर सुनावणी होत खंडाळा सरकारी वकील महेश यादव यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरत खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांनी दिपक वाघ,रोशन थोपटे,स्वानंद जगताप यांना दोषी धरत तीन वर्ष साधी कैद व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.याप्रकरणी सरकारी वकील महेश यादव यांना लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राँसिक्यूशन स्काँडचे पोलीस शिवशंकर तोटेवाड यांनी सहकार्य केले आहे.