धुमाळ यांचा बोलवता धनी कोण?
स्थैर्य, सातारा, दि. 9 : सातारा येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट म्हणून ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सातारा नगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक वर्ग 3 गणेश दत्तात्रय टोपे, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा आणि प्रवीण एकनाथ यादव, रा. एस.टी. कॉलनीच्या पाठीमागे, गोडोली, ता. सातारा या तिघांना पोलिसांनी आज येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, आज मंगळवारी दिवसभर या लाच प्रकरणाची पालिकेमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. बहुतांश नगरसेवक आणि अधिकार्यांनी आज पालिकेमध्ये येण्याचे टाळले होते. या प्रकरणात संकेत धुमाळ यांचा बोलवता धनी कोण असेल याबाबत आज दिवसभर अटकळी बांधल्या जात होत्या.
सातारा नगरपरिषद येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी सातारा पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ यांनी 2 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता आढळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सातारा नगरपालिकेच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. दुपारच्या दरम्यान तक्रारदार यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना संचित धुमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संकेत धुमाळ यांच्यासह या प्रकरणी पालिकेचे आरोग्य निरीक्षक गणेश दत्तात्रय टोपे आणि प्रवीण एकनाथ यादव या दोघांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना येथील न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
सातारा पालिकेतल्या एका बड्या अधिकार्याने लाच स्वीकारल्याची घटना कळताच सोमवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद मंगळवारी पालिकेत पाहायला मिळाले. मंगळवारी दिवसभर पालिकेमध्ये चिडीचूप वातावरण होते. अधिकारी व कर्मचारी कामाशिवाय कोणतीही चर्चा करत नव्हते तर दुसरीकडे मंगळवारी बहुतांश नगरसेवकांनी पालिकेत येण्याचे टाळले असतानाच संकेत धुमाळ यांचा बोलवता धनी कोण असावा याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.