
दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणीवेळी जमिनीच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांना काठी व दगडाने मारहाण करण्यात आल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दीपक गोरख रणवरे (रा. जिंती) यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रजत पोपट रणवरे, पिंटू पोपट रणवरे, आशा गुलाब रणवरे व ईश्वर गुलाब रणवरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती गावच्या हद्दीत ‘र्हराटी’ नावाचे शिवारात जमीन गट नंबर १२२ मध्ये ऊसतोड मजूर आल्याने फिर्यादी दीपक गोरख रणवरे (वय ४०, रा. जिंती) व त्यांचे वडील गोरख व पत्नी अश्विनी असे गेले असताना ऊसतोड चालू होती. त्यावेळी तेथे रजत पोपट रणवरे, पिंटू पोपट रणवरे, आशा गुलाब रणवरे व ईश्वर गुलाब रणवरे हे आले व म्हणाले की, तुम्ही ऊस तोडायचा नाही, जमीन आमची आहे. त्यावेळी माझे वडील गोरख हे त्यांना म्हणाले की, सदरची जमीन आमचे असून आम्ही आमचाच ऊस तोडत आहोत. असे म्हणताच रजत रणवरे व पिंटू रणवरे यांनी त्यांच्या हातातील काठीने माझी वडील गोरख यांना मारहाण केली. त्यात माझे जखमी झाले. त्यावेळी मी व माझी पत्नी अश्विनी असे दोघांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता आशा रणवरे व ईश्वर रणवरे यांनी आम्हाला दगडाने मारहाण केली व शिवीगाळ केली. तसेच तुम्ही जर परत या जमिनीत आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. असे दीपक रणवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी वरील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हांगे करत आहेत.