
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । सातारा शहरात वाहतूकीचा नेहमीच अनेकदा फज्जा उडालेला पहावयास मिळत होता. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटची संकल्पना आली अन ती पूर्ण झाली. आता याच ग्रेड सेपरेटरमध्ये या मार्गाची दिशा न समजल्याने परप्रांतीय या मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात बुधवारी सकाळी ११.३0 वा. घडला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.
पोवई नाका, सातारा परिसरातील ग्रेड सेपरेटरमुळे वाहतुक सुरळी सुरु व्हावा हा उद्देश होता पण सध्या ग्रेड सेपरेटरचा त्या तुलनेत वापर होतच नाही, त्यातच यामध्ये जाणारे वाहतूकदार हे जोरदार आवाज करणे, गोंधळ घालणे, विरोधी बाजुने वाहन चालविणे असे प्रकार आता नित्याचेच होवू लागले आहे. याचप्रकारे बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सेपरेटरच्या एका लेनमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघेजण जखमी झाले. कोणाच्या तोंडाला तर कोणाच्या हात, पाय, पोटाला लागले आहे. या जखमींना त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
या अपघातात मोहन खाशाबा जाधव वय ५३, रा. खिंडवाडी, सातारा, सुरेश रॉय वय २८ आणि सुनील कुमार वय ३८, सध्या दोघेही रा. करंजे, सातारा हे जखमी झाले आहेत. यामधील रॉय आणि कुमार हे परराज्यातील असून सेंट्रींग कामगार आहेत. यामधील मोहन जाधव यांना पुढील उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.