
स्थैर्य, वाई, दि. १६ : मालदेवाडी, ता. वाई येथे बुधवारी पहाटे 3.30 वाजता अचानक लागलेल्या आगीत तब्बल तीन घरे आगीत जळून भस्मसात झाली. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मालदेववाडी, ता. वाई येथे बुधवारी पहाटे दत्तात्रय नामदेव घाटे, सुरेश राजाराम घाट़े व रामचंद्र धोंडिराम घाटे या तिघांच्या घरांना अचानक आग लागल्याने घरातील जीवनावश्यक वस्त़ू, कौटुंबिक साहित्य, अन्नधान्य, रोख रकमेसह कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान गावातील ग्रामस्थ व तरुणांच्या सामुदायिक प्रयत्नाने ज्वालाग्रही पदार्थ, गॅस सिलेंडर यांच्यासह माणसांना बाहेर काढण्यात यश मिळाले. वेळेत किसनवीर कारखान्याचा अग्निशामक बंब पोहचल्याने आग आटोक्यात आली. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजच्या तलाठी सीमा साबणे यांनी भेट देवून आगीची माहिती घेतली. या आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले याचा पंचनामा घटनास्थळी दिवसभर सुरू होता.
वरील घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. स.पो.नि. शाम बुवा अधिक तपास करत आहेत.