उद्धव सेनेला सोडून माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते व श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला. मीरा भाईंदरमधील एका काँग्रेस नगरसेवकानेही भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री रविंद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दिप्ती भट्ट, अनिता पाटील व कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अवधूत तटकरेंचा भाजपा प्रवेश म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा झटका आहे व निश्चितपणे कोकणात त्यांना रोज असे झटके बसणार आहेत, असे मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मा. बावनकुळे म्हणाले की, युतीमध्ये भाजपाने रायगडसह कोकणात शिवसेनेला महत्त्व दिल्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले नव्हते. आता भाजपा स्वतंत्रपणे संघटना मजबुतीने उभी करत आहे. रायगड, पालघरसह कोकणात सर्वत्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणात सर्वत्र भाजपा कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत.

मा. अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद बारा वर्षे भूषविले होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते.


Back to top button
Don`t copy text!