स्थैर्य, सातारा, दि. 11 : तक्रारदार यांना विहिरीचे काम करून देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटाराच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी व कामाच्या बिलाची टक्केवारी अशी एकूण 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकजण रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
या प्रकरणी खंडाळा पंचायत समितीचे शाखा अभियंता भोसले (पूर्ण नाव माहीत नाही.), पारगाव खंडाळ्याचे ग्रामसेवक भाऊसाहेब गजानन सस्ते व खाजगी कॉन्ट्रॅक्टर अंबादास रामराव जोळदापके या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाखा अभियंता भोसले मिळून आला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांना मिळालेल्या विहिरीचे काम करून देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटार करण्याच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी तसेच त्या कामाच्या बिलाचे ग्रामसेवक सस्ते यांनी स्वतःसाठी 5 टक्के व शाखा अभियंता भोसले यांचेसाठी 5 टक्के असे एकूण 10 टक्के प्रमाणे 60 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबतची लेखी तक्रार तक्रारदार यांनी दि. 2 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार दि. 3 रोजी तक्रारीची पडताळणी करून दि. 10 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यामध्ये ग्रामसेवक सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईल वरून खाजगी कॉन्ट्रॅक्टर अंबादास रामराव जोळदापके, रा. नांदेड सिटी, पुणे यांना स्वीकारण्यास संमती दिली. त्यानुसार जोळदापके यांनी लाचेची रक्कम जिल्हा परिषद, साताराच्या गेटजवळ स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात जोळदापके यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक सस्ते यांना ताब्यात घेण्यात आले असून शाखा अभियंता भोसले हे मिळून आले नाहीत. त्यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथील पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्पे, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक फौजदार आनंदराव सपकाळ, पोलीस हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुखे, पोलीस नाईक संजय अडसूळ, प्रशांत ताटे, श्रद्धा माने, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, नीलेश वायदंडे, शीतल सपकाळ, चालक पोलीस नाईक मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन करण्यात येते, की लाच मागणीसंबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सि.स.नं 524/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा येथे संपर्क साधावा.