दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) विविध केलेल्या कारवाईत चार दुचाकी चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी संबंधित दुचाकी वाठार, सातारा व नऱ्हे जि. पुणे येथून चोरल्या असल्याची कबुली दिली असून यातील काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान, चोरट्यांनी बुलेट, पल्सर अशी वाहने चोरी केल्याचे समोर आल्याने त्यांच्याकडे याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. यामध्ये ज्ञानेश्वर विजय जाधव वय २३, रा. उडतारे ता. वाई, विजय बाळू जाधव वय २१, रा.भाडळे ता. सातारा, अनिकेत अनिल पिसाळ वय २१, शुभम राजेंद्र आवळे वय १८ दोघे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ८ रोजी एलसीबीचे पोलिस सातारा शहर, कोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी गस्त घालत होते. पोलिस पथक विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करत असताना गस्तीवर ते येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून होते. सातारारोड व शहरातील शनिवार पेठ येथे बंदोबस्तावरील पथकाला काही संशयास्पद युवकांना दुचाकीवर अडवले. वाहनांची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर दोन्ही ठिकाणी संबंधित युवकांनी दुचाक्या चोरुन आणल्याची कबुली दिली.
एलसीबी पोलिसांनी दुचाकी जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. दुचाकी चोरीबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यांकडे चौकशी केली असता चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करुन अधिक चौकशीला सुरुवात केली. संशयितांनी आणखी वाहने चोरली आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ, पोलिस हवालदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर, गणेश कापरे, शिवाजी भिसे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, स्वप्नील दौंड, प्रवीण पवार, केतन शिंदे, पंकज बेसके, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.