स्थैर्य, खंडाळा, दि.२८: फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन दुचाकी चोरत लंपास केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या चाणाक्षपणामुळे धनगरवाडी येथील युवकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना यश आले असून संबंधित चोरट्याला शिरवळ पोलीसांनी फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पोलीसांनी नितीन विठ्ठल काळे (वय 20, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनगरवाडी येथील नितीन काळे याने तब्बल तीन दुचाकी चोरल्या. याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फलटण शहर येथून धनगरवाडी येथील युवकाने दुचाकी चोरून आणल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांना मिळाली.
त्यानुसार शिरवळ पोलिसांनी सापळा लावला असता त्याठिकाणी दुचाकी चोरणारा नितीन काळे हा अलगद अडकला. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने कारवाई केली असून चौकशी दरम्यान नितीन काळे याने फलटण येथून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
यावेळी शिरवळ पोलीसांनी नितीन काळे याला फलटण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस कोठडी संपल्यानंतर फलटण न्यायालयासमोर नितीन काळे याला उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास फलटण पोलीस करीत आहे.