दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथे कुटुंबातील तिघांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अतुल इंगळे आणि संतोष इंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुरेश भानुदास इंगवले (वय ३९, रा. किडगाव, ता. सातारा) हे शिक्षक असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार, दि. १६ रोजी ते त्यांच्या शेतीमध्ये ज्वारी पेरणीसाठी गेले होते. यावेळी बैले चारण्याच्या कारणावरुन सुरेश इंगवले यांचे वडील भानुदास यांंना अतुल प्रकाश इंगळे आणि संतोष प्रकाश इंगळे (रा. पिंपळवाडी, ता. सातारा) या दोघांनी एकेरी भाषेत वाईट बोलून शिवीगाळ केली आणि हातात दगड घेवून अंगावर धावून आले. ही भांडणे सुरु असताना सुरेश आणि त्यांची आई पुढे आले असताना त्यांनाही दमदाटी करत धमकावण्यात आले. यावेळी सुरेश यांच्या पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अतुल इंगळे याने सुरेश यांच्या हातावर आणि पाठीवर कळकाच्या बांबुने मारहाण केली. यात सुरेश यांच्या हाताचे बोट मोडल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुरेश यांनी सोमवार, दि. १८ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अतुल इंगळे आणि संतोष इंगळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत.