पिंपरद येथे गांजा विक्री करताना तिघे ताब्यात; सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
पिंपरद गावच्या हद्दीत बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या तीन आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखा व फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६,४१,५००/- रूपये किमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३,०००/- रूपये किमतीची मोटारसायकल व दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणार्‍या इसमांविरूध्द कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत.

त्यानुसार दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पिंपरद (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीतील गगणगिरी मंगल कार्यालयासमोर तीन इसम मोटारसायकल (क्र. एमएच ११ बी.डब्ल्यू ५२९८) वरून अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांना पथकासह जाऊन त्या इसमांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस पथकाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने सापळा लावून त्या तीन इसमांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमांकडून एकूण ६,४१,५०० रूपये किमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३,००० रूपये किमतीची मोटारसायकल व मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करून त्यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, पोनि सुनील महाडिक, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, रवींद्र फार्णे, विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे आदींसह फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शांतीलाल ओंबासे, श्रीकांत खरात, सूरज काकडे, नितीन चतुरे यांनी ही कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!