
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । खंडाळा । भोर तालुक्यातील नर्हे गावात जेसीबीचा ब्रेकर चोरणार्या तिघाजणांना राजगड पोलिसांनी नामी शक्कल लढवून ताब्यात घेतले. चोरटे सापडत नसल्याने अखेर पोलिसांनी ‘जुना ब्रेकर विकत घेणे आहे’ अशी जाहिरातच सोशल मिडियावर टाकली व अनेकांच्या स्टेटस्वर ठेवली. या जाहिरातीमुळे चोरटे स्वतःहूनच पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेवून चोरून नेलेला जेसीबीचा ब्रेकरसह 31 लाखाचा मुद्देमालासह हस्तगत केला.
अक्षय राजेंद्र काटकर वय 25, व प्रफुल्ल ज्ञानेश्वर काटकर वय 35 (दोघेही रा. हरतळी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी मुद्देमालासह अटक केलेल्या आरोपींची नावे असून यात पळशी (ता. खंडाळा) येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. राजगड पोलिसांनी शिरवळनजीक पळशी परिसरात ही कारवाई केली असून 3 लाखाचा ब्रेकर चोरीसाठी आरोपींनी स्वतःचे जेसीबी, ट्रेक्टर आणि ट्रोली वापरले होते. राजगड पोलिसांनी चोरीतील ब्रेकरसह असे एकूण 31 लाखांचे मुद्देमाल जप्त केले आहे.
अधिक माहिती अशी कि, अजय अनंतराव वीर रा. नर्हे ( ता. भोर ) यांचा जेसीबीचा ब्रेकर दि. 20 जून रोजी चोरीला गेला होता. शेतकर्यांचे चोरीला गेलेले अवजार अथवा यंत्र सहसा हाती लागत नाही. त्यामुळे उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी नामी शक्कल लढवून पोलीस मित्रांच्याकरवी सोशल मिडीयावर ‘जेसीबीचा जुना असलेला ब्रेकर विकत घेणे आहे’ असा संदेश आजूबाजूच्या परिसरात पसरवला. काहींनी हा संदेश स्टेटस म्हणून ठेवले होते. पोलिसांच्या आयडियामुळे चोरटे फसलेव त्यांनी स्वतःहून पोलिसांनी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधून जुना ब्रेकर विक्रीसाठी असल्याचे ठिकाण सांगितले. त्यानंतर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली किकवी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी चोरट्यांनी दिलेल्या ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले. यावेळी चोरट्यांनी विक्रीसाठी दाखविलेला ब्रेकर हा चोरीचा असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केला. यानंतर चोरट्यांना ताब्यात घेवून मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.
सहायक उपनिरीक्षक ए. बी. खोमणे, हवालदार निवास जगदाळे, नाईक नाना मदने, गणेश लडकत, योगेश राजीवडे, नवनाथ चंदनशिवे यांनी या कारवाईत सहभाग घेऊन गुन्ह्याची उकल काढली असून किकवी पोलिसांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहे.