स्थैर्य, सातारा, दि. 13 : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव परिक्षेत्रात प्रवेश करणार्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे सिंगल बोअर बंदुकीसह दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. त्यांना मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता दोन दिवसांची वन कोठडी मिळाली.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.11 जून रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवमधील बामणोली परिक्षेत्रातील देऊर नियत क्षेत्रात वन्यजीव वनरक्षक गस्त घालत असताना अतिसंरक्षित गाभाक्षेत्रात ताकवली मुरा, ता. जावली येथील बिरू सखाराम माने, पांडुरंग लक्ष्मण माने, बाबुराव बिरू माने हे तिघे सिंगल बोअर बंदूक व दोन जिवंत काडतुसांसह आढळून आले. अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभाक्षेत्रात प्रवेश केल्याने व शस्त्र बाळगल्याने त्यांच्याविरोधात वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलम 9, 27, 31, 32 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे उभे केले असता तिघांनाही दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.
या कारवाईत वन्यजीवचे वनक्षेत्रपाल बा.द. हसबनीस, वनपाल वेळे, मो. बा. शिंदे, सूरज विनकर, दा.सा. जानकर आदींनी सहभाग घेतला.