महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । मुंबई । प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहूनकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे.

यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत साडेतीन शक्तिपीठे  आणि स्त्रीशक्ती जागरयांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्यापरीने उत्तमोत्तम संकल्पना निवडतात आणि कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊनहुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.  यावर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिरतुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूरमाहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासियांना घरबसल्या होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी मूर्तिकार आणि कलाकारांना संधी  दिली  आहे. यावर्षीची संकल्पनारेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत. ३० जणांचा समावेश असलेल्यायुवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संचालक बिभीषण चवरे व सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येत आहे.


Back to top button
Don`t copy text!