दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । सातारा । तालुक्यातील कारंडवाडी येथील महाडिक कॉलनी येथील एका युवकाचे वडील आणि त्याच्या भावाचे फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करत एका मुलीसोबत लग्न करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची तक्रार अभिजीत आनंदराव जगदाळे (रा. महाडीक कॉलनी, कारंडवाडी) यांनी दिली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेकांचे फेसबुकवर बनावट प्रोफाईल अथवा अकाऊंट तयार करुन पैसे मागणे तसेच ती हॅक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहे. परिणामी आता लोकांची सोशल अकाउंट अडचणीत आली असल्याची परिस्थिती आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, अभिजीत यांचे वडील आनंदराव व भाऊ योगेश यांचे फेसबूक व इनस्टाग्राम या सोशल साईटवरील अकाऊंट अज्ञातांनी हॅक केले. यानंतर अज्ञातांनी या अकाऊंटवरुन एका मुलीसोबत लग्न करावे म्हणून धमकाण्यास सुरूवात केली. यानंतर संबंधितांना सतत मेसेज करून मानसिक त्रास देणे सुरूच ठेवल्याने अभिजीत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे करत आहेत.