
दैनिक स्थैर्य । 9 एप्रिल 2025। फलटण । दीड वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यास वकील हजर न झाल्याने खटला बरखास्त झाला. या कृत्याने नाहक मानसिक त्रास झाला. याबाबतीत न्याय न मिळाल्यास बुधवार दि. 16 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा धुळदेव, ता. फलटण येथील किसन चंद्रकांत नरुटे (वय 48) यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोर्टात माझा फौजदारी खटला सुरू असून गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 ही कोर्टाने तारीख दिली होती. त्याप्रमाणे मी कोर्टात हजर होतो परंतु माझा खटला लढत असलेले वकील गैरहजर असल्या कारणाने केस ही बरखास्त करण्यात आली. त्या दिवशी वकील हे त्यांच्या घरीच होते. त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी 11 वाजता कोर्टात येऊन थांबा, असे सांगितले.
त्याप्रमाणे मी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळी कोर्टात हजर होतो. दुपारी त्यांच्या सहाय्यक वकिलांनी येऊन सांगितले की, वकील वकील साहेब हे दुपार नंतर येतील. परंतु ते आलेच नाहीत. ते ही केस दीड वर्षापासून चालवत आहेत. त्यांना तारीख असल्याचे माहित असूनही तसेच वारंवार फोन करून सुद्धा ते कोर्टात आले नाही.
त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे मला नाहक मानसिक त्रास झाला आहे. याबाबतीत मला न्याय मिळावा यासाठी बुधवार दि. 16 एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.