दिवाळीच्या सुट्टीत गोंदावले येथे हजारोंची गर्दी


गोंदावले (ता. माण) – येथे भाविकांनी समाधी मंदिरात दर्शनासाठी लावलेल्या लांबलचक रांगा. तसेच समाधी मंदिर परिसरात दिवाळीनिमित्त काढलेल्या आकर्षक रांगोळ्या. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि.25 ऑक्टोबर : रामनामाची महती संपूर्ण जगाला सांगणार्‍या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीस्थळी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे सध्या रामभक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
दीपावली सणाचा आनंद साजरा करत रामभक्त सध्या महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत आहेत. दिवाळीनिमित्त समाधी मंदिर परिसरात केलेले आकर्षक फुलांची सजावट तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या या भक्तांचे मन भरून टाकत आहेत. नीटनेटके व्यवस्थापन, शिस्तबद्ध रांगा तसेच महाप्रसादासाठी केलेले व्यवस्थापन यामुळे हजारो भक्त येथे येऊन सुखावून जात आहेत.

दिवाळी सणाचा आनंद कुटुंबीयांस समवेत घेताना दर्शनासाठी प्रचंड मोठ्या रांगा परिसरात लागत आहेत तरीसुद्धा नेटके व्यवस्थापन आणि चार चाकी वाहनांसाठी केलेली पार्किंगची सुसज्य व्यवस्था यामुळे भक्तांना एक दर्शनाचा वेगळाच अवर्णनीय असा आनंद होत आहे.
त्यातच दुपारी बारा ते दोन या वेळेत प्रसादासाठी येथे भाविक महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने दुसर्‍या पर्यटन स्थळाकडे वाटचाल करत आहेत. एकंदरीतच दरवर्षी दिवाळी सणाचा आनंद घरी साजरा करून महाराजांच्या दर्शनासाठी येत असलेल्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून अतिशय सुसूत्रपणे केलेले हे नेटके व्यवस्थापन खरोखरच आदर्श असे मानावे लागत आहे.

 


Back to top button
Don`t copy text!