फलटणच्या पुरोगामी चळवळीचा योद्धा : हरिष काकडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । फलटण । समाजकारणाचा वसा व विधायक विकासातून राजकारणाचा समर्थ वारसा घेऊन अनेक वंचित,उपेक्षित व दलित बांधवांचे आयुष्य घडवणारे,आपल्या कार्य कर्तृत्वातून मिळालेली अनेक पदे समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करणारे, मग त्यामध्ये जिल्हा एम्प्लॉयमेंट कमिटी असो, नगरसेवक पद असो, जिल्हा खरेदी विक्री संघ, फलटण शेती माल प्रक्रिया संस्था, यशवंत सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्यपद इ.असो आपण या सर्व पदांचा वापर तळागाळातील वंचित, शोषित, भटक्या – विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी निःस्वार्थी भावनेने केलात. तुम्ही आमचे आदर्श आहेत. समतोल वाचनाचा व्यासंग, सामाजिक प्रश्नांची व राजकीय प्रश्नांची उत्तम जाण असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे हरीष काकडे ऊर्फ नाना. नाना तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहात त्याबद्दल अभीष्टचिंतन!!!

हरिष काकडे ‘नाना’ म्हणूनच त्यांना संबोधले जाते.त्यांचे सुरवातीचे प्राथमिक शिक्षण शाळा नं. २ मध्ये झाले.त्यावेळी जंगम, कोळी गुरुजी व ग.दा.काकडे (गणपत दादू काकडे) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.प्राथमिक शाळेत त्यांनी कलापथकात ही काम केले.पुढे ते आठवीला मुंबईच्या मराठा मंदिरात दाखल झाले.त्यानंतर इयत्ता ९ वीला ते मुधोजी हायस्कूलमध्ये दाखल झाले.असे करत करत त्यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जयंतीच्या कार्यक्रमामध्ये वयाच्या १२ व्या वर्षापासून आपले विचार प्रकट करत आल्यामुळे चळवळीची ओळख त्यांना लवकरच झाली. त्यांचे वडील ही सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय असल्याने ते याच मुशीत तयार होत गेले. वडिलांचा त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांना वडिलांनी मुक्तपणे वाढू दिले. वडील पडेल ते काम करायचे.आई अत्यंत कष्टाळू होती. ती गवत आणून विकायची.वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. आपल्या मुलांचे शिक्षण घ्यावे उच्च पदावर काम करून कला क्रीडा गुणांसह सामाजिक क्षेत्रात योगदान द्यावे द्यावे असे त्यांना मनोमन वाटे. विद्यार्थीदशेपासूनच पी आर काकडे सर त्यांना अभ्यास करायला लावायचे.सामाजिक प्रबोधनाची पुस्तके वाचायला द्यायचे. त्यांना पी आर काकडे, अरुण काकडे, बबन पवार, संभाजी मोरे यांचे मार्गदर्शन मिळत गेले. पी.आर काकडे सरांच्यामुळे नानांना वाचनाची प्रचंड आवड लागली. आज ही त्यांची आवड त्यांनी जपली आहे. पी.आर काकडे स्वतः त्यांना शिवाजी वाचनालयात घेऊन जायचे. पुढे अॅड बी.सी. कांबळे, हरिभाऊ निंबाळकर, आर.आर भोळे, अॅड. जी.बी. माने यांना जयंतीच्या कार्यक्रमाना आणण्यात नानांचा पुढाकार होता. १९७० साली वयाच्या विसाव्या वर्षी ते महात्मा फुले कामगार वसाहतीत राहायला आले.पुढे १९७० साली साहस क्रीडा मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून कला,क्रीडा व समाज प्रबोधनाच्या कामाला सुरवात केली. साहस क्रीडा मंडळाचा व्हॉलीबॉल संघ प्रसिद्ध होता.त्या संघाने अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यात दास काकडे, दत्तात्रय गालीअल,मानसिंग भोसले, प्रकाश सोनू अहिवळे असे खेळाडू होते.साहस क्रीडा मंडळाच्या कामात पुढाकार घेतला. या मंडळाच्या स्थापनेत पी.आर.काकडे सरांचे मोठे योगदान लाभले. त्याच प्रमाणे नामदेव बबन अहिवळे, साहेबराव पांडुरंग अहिवळे यांचा ही त्यात समावेश होता.

नानांनी महात्मा फुले वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळ बळकट केली. वैचारिक पुस्तकाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले. त्यातूनच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता घडत गेला. आज ही ते त्यांच्या परीने समाज कार्यात सहभाग घेतात.त्यांच्यातील प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा यामुळेच ते नितिमान जीवन जगत जगले व जगत आहेत. आज समाजात चाललेला मतभेद त्यांना प्रचंड त्रास देतोय. त्यांनी तह्यात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही.१९७२ च्या दुष्काळी परिस्थिती अतिशय बाकी होती. लोकांना काम धंदा मिळणे मुश्कील झाले होते.उपासमारीची वेळ होती. सरकारने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी योजना सुरु केली.पण शहरी भागासाठी तशी सोय नव्हती.पण फलटणच्या लोकांना जिनिंग कंपनीत मजुरी होती.त्यांना शेतातून कापूस वेचावा लागायचा. पण या मजुरीत मंगळवार पेठेतील बायकांना देत नव्हते. त्यावेळी नाना युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.मजुरांना 50 पैशात झुणका भाकर मिळायची. या अत्यंत हलकीच्या परिस्थितीत नानांनी व्यवस्थापनाशी व तत्कालीन कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्व महिलांना मजुरी मिळवून दिली.असा प्रकारे त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली.

१९७४ च्या दंगलीच्या वेळी अॅड. जी.बी माने प्रणित जयंतीचे अध्यक्ष होते.यावेळी दोन जयंत्या निघाल्या.गांधीजींचा हात तुटला. याचा फायदा जातीयवाद्यांनी घेतला. अनवधानाने घडलेल्या घटनेला विकृत रूप देण्यात आले. यातून दंगल घडवली.या कठीण प्रसंगी नाना डगमगले नाहीत. ही जयंती काढण्याचा हेतू तात्विक होता.पण याला गालबोट लागले.मनुवाद्यामुळे घरे जळाली, दुकाने जळाली, मारहाण झाली. पण यातून उद्वस्त झालेली घरे पुन्हा उभे रहावीत, नव्याने उभी करून लोकांना उभे करण्यासाठी डॉ.कृष्णचंद्र भोईटे, वसंतराव नाईक यांच्या मदतीने यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मदत मिळवली. लोकांची झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्व. यशवंतराव चव्हाण स्वतः केंद्रीय मंत्री होते. त्यांनी तत्कालीन नियोजन राज्यमंत्री श्री. मोहन धारिया यांना पाठवले. मोहन धारिया यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक्क घेतली. त्यांनी या दंगलीची झळ पोहचलेल्या बांधवाना अर्थसहाय्य करण्याचे आव्हान केले. यावेळी कॉंग्रेस कमिटीने घरे बांधून दिली.स्वतः मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच जातीने लक्ष घातले. स्व.यशवंतराव चव्हाणांनी सर्व मदत केली आणि पुन्हा नव्याने लोकांचे संसार उभे राहिले. नानांनी सर्व गोष्टी स्वतः उभे राहून पाठपुरावा करून पूर्ण करून घेतल्या. त्यांनी व्यापाऱ्यांची मदत घेतली.बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांचे कर्ज उपलब्ध करून दिले. लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरु केले.काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करण्यासाठी स्वतः यशवंतराव चव्हाण आले होते. यावेळी पाहिली सभा मंगळवार पेठेत झाली. यावेळी नानांनी खरी परिस्थिती सर्वांसमोर मांडली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “ आकाराची पूजा करून विचारांचा मुडदा पाडण्यात आला.”या प्रकरणात दलितांना मोठी किंमत मोजावी लागली. ही किंमत आज ही भरून निघाली नसल्याची खंत आज ही नानांना वाटते. याचा आधार घेऊन यशवंतरावांनी आपल्या गजानन चौकातील आपल्या भाषणात विचार व्यक्त करताना ते म्हणाले, “ गांधीजींच्या विचारांची पायमल्ली झाली. आकाराची पूजा करून खरोखरच आपण विचारांचा मुडदा पडला आहे नानांनी आपल्या भाषणात म्हटले की, दलितांच्या बद्दल करुणास्पद बोलणे ही पुरोगामीपणाची पद्धत बनली आहे.’’ याचाच आधार घेत नानांनी अनेक कामे मार्गी लावली.

तसा त्यांचा पिंड समाजकार्याचा नव्हता. ते बुजरे, भिडस्त होते. पण पी.आर. काकडेंच्या सहवासाने, मार्गदर्शनाने ते समाजकार्याकडे वळले. ते काम आज ही चालू आहे. साखरवाडीत पी.आर काकडे तलाठ्याच्या हाताखाली काम करत असताना अॅड. जी.बी माने वकिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,खाण कामगार, झोपडपट्टीतील लोकांसाठी अनेक कामे हाती घेतली. त्यांनी वाचनालये सुरु केली.

सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटना :
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटनेत नानांनी उपाध्यक्ष पद भूषवले.या संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने होते.त्यांच्यासोबत ही नानांनी काम केले.विभागीय बैठका घेतल्या.सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी बैठक आयोजित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.नामांतरासाठी निघालेल्या लॉंगमार्चमध्ये ही त्यांचा सहभाग होता.यामध्ये जेष्ठ पत्रकार विजय मांडके, रामनाथ चव्हाण,पार्थ पोकळे, अॅड. जी.बी माने यांच्या बरोबर काम करून वस्तीगृह, शिष्यवृत्ती यासारख्या प्रश्नावर लढा दिला.

सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक

या संघात अनेक वर्षे संचालक,उपाध्यक्ष म्हणून दैदिप्यमानकार्य नानांनी केले. यामध्ये किसनवीर, माजी आमदार लालसिंग शिंदे, माजी आमदार बाबुराव घोरपडे, केशवराव पाटील,लक्ष्मण पाटील हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा खरेदी विक्री संघावर होते.तर मदन पिसाळ हे निवडून आले होते.यांच्यासारख्या लोकांसोबत जवळ जवळ १७ वर्षे या संघात काम केले.

सातारा जिल्हा मागासवर्गीय सुधार महासंघ अध्यक्ष या महासंघाच्या माध्यमातून नानांनी अनेकांना मदत केली.त्यावेळी बॅ. अंतुले यांनी संपूर्ण बॅकलॉक भरण्याचा आदेश दिला होता.यावेळी विदर्भातील कॉंग्रेसचे नेते नाशिकराव तिरपुडे यांनी सेवा योजना कार्यालयाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थाना दिली होती.यात त्यांनी सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नानांची निवड केली. या महासंघाचे कार्याध्यक्ष होते साहेबराव काकडे ते काम पाहत होते.या महासंघाचे ऑफिस महालक्ष्मी बेकरी, जनता लॉड्री येथे होते. या महासंघाच्या स्थापनेचा उद्देश चांगला होता. सेवायोजना कार्यालयाचीच जबाबदारी या महासंघाकडे देण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थानी पात्र उमेदवारांची यादी करून संबंधित विभागाकडे पाठवायची होती. यामुळे मंगळवार पेठेतील ९ उमेदवारांना तलाठी पदासाठी नानांनी शिफारस केल्याने त्यांची तलाठी म्हणून निवड झाली. त्यांनी अनेक खात्यातील वनरक्षक, महसूल,पाठबंधारे या खात्यांसह अनेक खात्यातील पात्र उमेदवारांना नानांनी संधी दिली.

महात्मा फुले विचार प्रसारक मंडळ १९७१ साली कार्यरत.

सामाजिक समतेचा प्रचार होऊन बहुजन समाज समताधिष्टीत बनावा यासाठी अॅड. जी.बी माने,बबनराव अडसूळ, बबनराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली.यामध्ये फलटणमधील समतावादी विचाराने कार्य करणारे कार्यकर्ते होते. यात विलासराव बोरावके, पी.आर काकडे, सुभाष निंबाळकर,बनकर, लोणकरसर, इतिराज, एल.एस अहिवळे, कीर्तीकुमार काकडे यांचा समावेश होता.यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले.या विचार प्रसारक मंडळाच्या माध्यामतून महात्मा फुल्यांची जयंती कार्यक्रम आयोजित केला.यासाठी प्रसिद्ध विचारवंत ग.बा सरदार व शंकरराव खरात आले होते.कार्यक्रम राजवाड्यातील मुदपाकखाना सध्याची जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत आहे त्या जागेवरील मैदानात झाला.समोर मोठमोठे दिग्गज लोक ऐकण्यासाठी बसले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतः नानांनी केले.त्यामुळे त्यांची स्रोत्यावर वेगळीच छाप पडली.

पुणे आकाशवाणी केंद्रावर युवा वाणी सदरात विचार मांडण्याची संधी
या वेळी अॅड. जी.बी माने वकिलांचे मित्र आकशवाणी पुणे चे संचालक बी.बी भोसले सहकारी जाधव यांच्यावर तर खूपच प्रभाव पडला. म्हणून त्यांनी आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणाऱ्या युवा वाणी या सदराखाली मला काय वाटते या शीर्षकाखाली सुरु असणाऱ्या कार्यक्रमात नानांना संधी दिली.यामध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर ८ मिनिटे नानांनी आपले विचार व्यक्त केले.पी.आर काकडे सरांनी हे भाषण प्रसारित झाल्याची बातमी सांगितली. या महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नानांचा सिहांचा वाटा होता.व्याख्यानमालेसह निबंध, वक्तृव,रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही अनेक वेळा केले गेले.

दैनिक मराठा मध्ये लेखन
तो काळ होता चळवळीचा, शिक्षणाचा प्रसार होत होता. नुकतीच शिकलेली पिढी तयार होत होती.सामाजिक समतेसाठी अनेक चळवळी सुरु होत होत्या. लोक जागृत होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागले होते.जातीयता अजून ही पूर्वीसारखी जागृत होतीच.ती आपले वेळोवेळी उग्र रूप दाखवतच होती. अशीच घटना घडली. जातीयवाद्यांनी गवई बंधूंचे डोळे काढले.या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले.या घटनेचा निषेध करण्यासाठी पी.आर.काकडे सरांनी नानांना लेख लिहिण्यास सुचवले. दैनिक मराठा मध्ये नानांनी लेख लिहिला.यावर स्वतः प्राचार्य विलायत शेख यांनी नानांना भेटून लेख बद्दल कौतुक केले व कामाची स्तुती केली.ते म्हणाले, “माझ्या अगोदर तुमचा लेख छापून आला”अशा प्रकारे लेखनास नानांच्या सुरवात झाली. १९७४ साली नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. कॉंग्रेसच्या वतीने बाबासाहेब मोरे निवडणुकीला उभे होते.त्यांना चिमणराव, हरिभाऊ यांची मदत होती. स.रा भोसले निवडून आले.त्यावेळी भोईटे बाबासाहेब मोरे यांचे बरोबर होते.पण अंतर्गत कलहामुळे, गटबाजीमुळे बाबासाहेब मोरेंचा पराभव झाला. नानांनी नेहमी समतावादी विचारांची कास धरली.जिथे समानतेची वागणूक मिळेल त्यांच्या समवेत ते कायम राहिले.माजी आमदार डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांच्याशी त्यांचे शेवटपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध राहिले.आज डॉ.कृष्णचंद्र भोईटे नाहीत पण त्यांचा स्नेह मात्र नानांनी आयुष्यभर जपला.

नगरसेवक
२००१ ते २००६ या कालावधीत नानांनी नगरसेवक म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी महात्मा फुले कामगार वसाहतीत २ समाज मंदिरे उभारली.सांडपाण्याची व्यवस्था,अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली.आज कामगार वसाहतीत असणारे बुध्द विहार त्यांच्याच प्रेरणेमुळे उभे राहिले.

नानांनी विविध पदावर काम केले.त्यांनी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना फलटणमध्ये आणून कॉ.हरिभाऊ निंबाळकरांच्या हस्ते मानपत्र दिले.त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रैली काढली. म्युनिसिपल कामगारांच्या न्यायी हक्कांसाठी प्रयत्न केले.यशवंत सहकारी बँकेत ते स्थापनेपासून संचालक आहेत.सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर ही त्यांनी प्रभावी काम केले आहे.आणीबाणीच्या काळात २० कलमी कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या जमीन वाटप समितीवर ही ते होते.अशा प्रकारे मिळालेल्या विविध पदांचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कधीच वापर केला नाही.समाजाच्या हिताचाच कायम त्यांनी विचार केला.आज ही त्यांचे कार्य थांबले नाही.आज वयाच्या ७१ मध्ये प्रवेश करताना जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे.त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे व आरोग्यमय जावो.त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व राजकीय चळवळीचा आदर्श घेऊन इतरांपर्यंत पोहोचावा त्यातून इतरांना प्रेरणा घ्यावी.त्यांना त्यांच्या जन्मदिनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐

सोमिनाथ पोपट घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
मु.पो सासकल ता.फलटण
मो.नं.७३८७१४५४०७
इमेल : [email protected]


Back to top button
Don`t copy text!