स्थैर्य, सातारा, दि. 30 : अनेक वर्षांपासून येथे हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने रहात असताना दोन शेजारी कुटुंबात भांडणे होऊन जो गावामध्ये येत नाही अशी विकृती हस्तक्षेप करून हिंदू-मुस्लिम वाद वाढवत असेल तर त्याला सर्वानी खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे. त्याचेपासून वेळीच सावध व्हावे अन्यथा कुणीतरी भानगडी करून चुकीच्या मार्गाचे अनुकरण केल्यास तेथे व्यापार ठप्प होऊन त्याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागतात. असा इशारा कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिला.
सातारारोड ता. कोरेगाव येथे काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम समाजात दरी वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दूरक्षेत्राचे आवारात हिंदू-मुस्लिम शांतता व सलोखा मिटींगमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचेकडून न्याय मिळत नसल्याचे निवेदन काही मुस्लिमांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले होते. त्यानंतर साळुंखे हे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असून त्यांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन सातारारोड येथील सर्व ग्रामस्थ, महिला व मुस्लिम बांधव, दूरक्षेत्रातील सर्व गावातील पोलीस पाटील यांचे सह्यानिशी जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सपोनि साळुंखे यांचेवरील सर्व आरोपांचे खंडन करून पोलिस निरीक्षक गोडसे म्हणाले, आपला सगळा कायदा साक्षीदारावर चालतो.साळुंखे यांनी येथे आल्यापासून सर्वांचे सहकार्याने अत्यंत उठावदार काम केले आहे. वाद झालेल्या दोन्ही कुटूंबियांना एकत्र करून त्यांचे गैरसमज दूर केले जातील.याला कुणीही हिंदू- मुस्लिम भांडताचा रंग न देता सलोखा निर्माण होणे गरजेचे आहे.