‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंचा कसून सराव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । पुणे । हरियाणा येथे ३ ते १३ जुन २०२२ या कालावधीत चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी २१ क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे ३५५ खेळाडू पात्र ठरले असून त्यांच्या सराव शिबिरास बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ येथे प्रारंभ झाला आहे. स्पर्धेत १०८ प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसह ४६३ सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे.

स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित हे शिबिर ३१ मेपर्यंत चालणार आहे. तर काही स्पर्धेचे ७ जूनपर्यंत चालणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. ४ जून रोजी स्पर्धेचे उद‌्घाटन होणार असून १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. बालेवाडीतील सराव शिबिरानंतर १ ते ८ जून या कालावधीत हे सर्व संघ हरियाणाकडे रवाना होतील. साय  कल रोड रेस आणि आर्चरी हे संघ ८ जून रोजी म्हणजे सर्वात शेवटी हरियाणाला जातील. तोपर्यंत त्यांचे टप्प्याटप्प्याने बालेवाडीत सराव शिबिर सुरू राहणार आहे.

’खेलो इंडिया’त महाराष्ट्राची कामगिरी

केंद्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत देशातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन २०१७-१८ पासून करण्यात येते. २०१७-१८ या वर्षी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेअंतर्गत पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ३९७ खेळाडू १३ खेळ प्रकारांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने एकूण ३६ सुवर्ण, ३२ रौप्य, ४३ कांस्य अशा एकूण १११ पदकांसह द्वितीय स्थान प्राप्त केले होते.

पुढील वर्षी २०१८-१९ मध्ये १७ व २१ वर्षाखालील मुले- मुली या गटाच्या एकूण १८ खेळ प्रकारांच्या द्वितीय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे करण्यात आले. या स्पर्धेत ७२९ खेळाडू व १६० पदाधिकारी असे ८९९ सदस्यांचे महाराष्ट्र राज्याचे पथक सहभागी झाले. राज्याने एकूण ८५ सुवर्ण, ६१ रौप्य ८१ कास्य अशा एकूण २२७ पदके संपादन करुन संपूर्ण देशातून एकूण पदक तालिकेमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले.

गुवाहाटी येथे ९ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत २० खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १९ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे ५९० खेळाडू पात्र ठरले. १४५ पदाधिकारी मिळुन एकुण ७३५ सदस्यांचे पथक सहभागी झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघास १४७ सुवर्ण, १०७ रौप्य व १५४ कास्य असे एकुण ४०८ पदक महाराष्ट्राने मिळवले आहेत.

महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम ठेवण्याचा खेळाडूंचा निर्धार

खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी स्पर्धा आहे. त्यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिराज्य गाजवले आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने दिलेल्या सुविधांमुळे खेळाडूंना अनेक क्रीडा प्रकारात चांगले यश संपादन करता आले आहे.. खो-खो, मल्लखांब, कबड्डी आणि कुस्ती या खेळात महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. आतापर्यंत खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र अव्वल राहिला आहे. याही वर्षी तो कायम राहण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे. त्यादृष्टीने क्रीडानगरीत त्यांचा कसून सराव सुरू आहे.

सहभागी क्रीडा प्रकार

राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४), बॅडमिंटन (४), कुस्ती (३३), गटका (१६), थांगता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), ॲथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरणार आहेत.

खेलो इंडियासाठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ सज्ज

खेलो इंडियासाठी महाराष्ट्राचा मुलींचा कबड्डी संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी बालेवाडीत सध्या त्यांचा सराव शिबिर सुरू आहे. मुलींच्या संघाने यंदा जय्यत तयारी केली आहे. हा संघ १८ वर्षांखालील असून ६५ किलो वजन गटात तो खेळणार आहे.

बालेवाडीत सराव शिबीरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

चौथ्या खेलो इंडीया क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाचे १३ दिवसांचा सराव शिबीर शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु आहे स्पर्धेसाठी सहसंचालक चंद्रकांत कांबळे, यांची समन्वयक अधिकारी तर उपसंचालक अनिल चोरमले पथक प्रमुख तसेच क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रीडा क्षेत्रातल्या चांगल्या मार्गदर्शकांच्या निरीक्षणाखाली खेळाडू तयारी करीत आहेत.

ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त राज्यातील उत्तम खेळाडूंना राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी हरियाणाला पाठवित आहोत. खेळाडुंचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. खेलो इंडियाच्या गेल्या तीन स्पर्धांमध्ये राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे, यावर्षीदेखील प्रत्येक खेळाडू पूर्ण प्रयत्न करून राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करतील.


Back to top button
Don`t copy text!