दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । यंदाचे ‘यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारा’चे मानकरी मधुकर भावे यांचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांनी केलेली पत्रकारिता ही महाराष्ट्राने बघितलेली आहे. या सर्व कार्याची दखल घेत यावर्षीचा म्हणजेच सन 2023 चा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ हा मधुकर भावे यांना देणार असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले.
येथील नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयात थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित दहाव्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’च्या समारोपाच्या सत्रात विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. व्यासपीठावर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, हरणाई सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा.रमेश आढाव, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी – बेडके, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण येथे “श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार” हा मधुकर भावे यांना जाहीर केलेला आहे. त्यांना जाहीर केल्यानंतर त्या पुरस्काराचा स्वीकारच त्यांना करावा लागेल. तुम्ही स्वीकार कराल का ? असा कोणताही प्रश्न न विचारता थेट दादागिरीच्या पद्धतीनेच तुम्हाला हा पुरस्कार जाहीर करत आहे. त्यामुळे तुम्हाला या पुरस्काराचा स्वीकार करावा लागेल, असेही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
मे महिन्यामध्ये “श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कारा” चे वितरण फलटण मध्ये करण्यात येते. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी येणाऱ्या मे महिन्यामध्ये फलटणसाठी राखीव वेळ काढून ठेवावा. राज्यांमध्ये कोणत्याही ठिकाणी तुमचे नियोजित कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम उरकून मे महिन्यामध्ये पुरस्कार स्वीकार करण्यासाठी तुम्हाला फलटणमध्ये यावेळेस यावेच लागेल, असेही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.