दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । पुणे । महाराष्ट्र विकास केंद्र पुणे या संस्थेमार्फत दिला जाणारा जलमित्र पुरस्कार यावर्षी जेष्ठ पर्यावरण व निसर्ग रक्षक, नदी अभ्यासक डॉ. जगदीश गांधी यांना जाहीर झाला असून पुणे येथे सोमवारी (दि. 26 डिसेंबर) पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
या बाबत महाराष्ट्र विकास केंद्राने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या एका व्यक्ती अथवा संस्थेला दरवर्षी जलमित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून यावर्षी नदी संशोधक व अभ्यासक, पुरातत्व वास्तूशिल्प संरक्षक, पर्यावरण व निसर्ग रक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले मा. जगदीश गांधी यांची निवड करण्यात आली आहे. मा. गांधी यांनी पाच हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सरस्वस्ती नदीचा शोध आणि त्याचा वैज्ञानिक अभ्यास केला असून सरस्वती नदीचे पंचवीस किलोमीटरचे पात्र पुनरुज्जीवित करुन नदी प्रवाहित केली आहे. जगातील सर्वात मोठा जल संवर्धन प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची नोंद झाली आहे. सरस्वस्ती नदीच्या शोधकार्यासाठी मा. गांधी यांनी चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला असून आपल्या आयुष्यातील तब्बल 57 वर्षे त्यांनी यासाठी खर्च केली आहेत. भारतीय जल चळवळीला नवा आयाम देणाऱ्या जगदीश गांधी यांना डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी अध्यक्ष, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. जी. बी. देगलूरकर यांच्या हस्ते व गोमुख संस्थेचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नदी अभ्यासक डॉ. विजय परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली जलमित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक मा. आनंद रायते (IAS) व वनराई ट्रस्टचे अध्यक्ष मा. रविंद्र धारिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोमवार दि.26 डिसेंबर रोजी सायं.6 वा. तरवडे क्लार्क इन सभागृह, शिवाजीनगर, पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमास जलप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील व जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी केले आहे.
राजेंद्र शेलार, सातारा
अध्यक्ष, जलमित्र पुरस्कार निवड समिती, पुणे