वारकरी संप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील मोठा निर्णय
स्थैर्य, पुणे, दि. 29 : कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी. किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.
कोरोना संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारीचं काय होणार? हा प्रश्न सर्व वारकऱ्यांना पडला होता. यावर अखेर आज निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाईल. देहु आणि आळंदीहुन पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतच्या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची? आळंदी आणि देहुहुन पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या? याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहुवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.