स्थैर्य, सातारा, दि.१६ : कोरोनामुळे गेल्या नऊ, दहा महिन्यांपासून
बळीराजासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील 900
ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची
शक्यता आहे. त्यामुळे गावपातळीवरील हेवेदावे कार्यकर्त्यांनी सोडून या
निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले
आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील कार्यकर्त्यांना
खासदार उदयनराजे यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. ग्रामपंचायती हा
ग्रामविकासाचा पाया समजला जातो, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लोकशाहीचा
पाया संबोधल्या जातात. गावात आजही निवडणुका सोडून अन्य बाबतीत गट-तट
बाजूला ठेऊन यात्रा-जत्रा आणि गावाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात.
निवडणुका आल्या की इर्षेतून घमासान घडते. प्रसंगी गाव वेठीस धरले जाते.
अलीकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर जवळजवळ सर्वच गावांत दोन उभे गट
पडलेले दिसून येतात, तसेच सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता ग्रामीण
भागातील जनता लॉकडाउन, अनलॉक या प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आली आहे. अशा
परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे 900 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम
जाहीर झाला आहे. या निवडणुका गावपातळीवरील असल्याने त्याचा धुरळा गावातील
प्रत्येक घरात उडणार आहे.
त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्याऐवजी
हेवेदावेविरहित सर्वांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास
त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील. गावाच्या एकीद्वारे “गाव करील ते राव
काय करील…’ ही म्हण सार्थ ठरविणाऱ्या या निवडणुका संपूर्ण देशाला नवी
दिशा देणाऱ्या ठरतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणुका हे मर्म
प्रत्येक कार्यकर्त्याने जाणून घेऊन आपल्या गावच्या हितासाठी साध्य करावे,
असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.