
मी एक शिक्षक आहे ! आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश ! मै भी टिचर होता ! येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात.
वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि…. दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही. मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. मी शाळेत आहे… शाळेत जात आहे….. हे सांगणं किती मस्त वाटतं. मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते. विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. एकदम…. कssडssक.
एकंदरीत काय तर…. शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते.
इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहता शिक्षक खूपच प्राजक्ती वाटतात. बाईंचा गजरा मुलींसाठी कौतुकाचा विषय असतो. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी.. कबड्डी म्हणत सर स्वार होतात…. आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. जगण्याचा उत्सव हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो. निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. काय असतात यांचे ऋणानुबंध ? कळत नाही.
काहीही म्हणा…. हे पुण्य फक्त शिक्षकालाच लाभले. बहुतांश शिक्षक खेड्यापाड्यात शिकले, घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले. खेड्यातील मुलांनाही. सर… मॅडम ..मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम गर्दी असते. मुलं ज्याम खुष असतात.
हे सारं असं होतं….
मग अभिमान वाटू लागतो…
आपण शिक्षक असल्याचा. आचार्य चाणक्य शिक्षक होते.
सावित्रीबाई शिक्षिका होत्या, महात्मा फुले शिक्षक होते.
नामदार गोखले शिक्षक होते. केशवसूत शिक्षक होते..
डॉ. ए.पी.जे. कलाम, आचार्य अत्रे शिक्षक होते…
ताराबाई मोडक.. अनुताई वाघ शिक्षिका होत्या.
श्री साने गुरुजी शिक्षक होते. आज मीही शिक्षक आहे. अभिमान आहे.
का नाही लोकांना हेवा वाटणार ? वाटणारच. ते विचारतील… कसं काय बुवा हे झालं ? त्यांना मस्त संत नामदेवांचा अभंग ऐकवावा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. शिक्षक सेवेचे कार्य वाट्याला आले.