दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रेला ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नफरत तोडो, भारत जोडोच्या घोषणा देत या यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे शाळकरी मुलेही उत्साहाने पुढे येत सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेवर विरोधकांकडून टीकाही केली जात आहे.
कन्याकुमारीपासून ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली असून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पाच दिवसांनी आता शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नेते, पदाधिकारी, साहित्यिक, वकीलांपासून ते सर्वसामान्य नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. जिल्ह्यात देगलूरपासून यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने स्वागत करण्यात आले. कॉँग्रेससह इतर पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
अशी आहे राहुल गांधी यांची दिनचर्या
– सकाळी पाच वाजता राहुल झोपेतून उठतात. हलका व्यायाम करतात. एखाद्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळ खेळतात. त्यानंतर चहा, नास्ता करतात
– सकाळी कार्यकर्ते, राहुल स्वतःच साफसफाई करून निवास ठिकाण सोडतात.
– सहा वाजता त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होते. त्यानंतर ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असतो त्याच परिसरातून सकाळच्या टप्प्यातील यात्रेला सहा वाजताच्या सुमारास सुरुवात होते.
– राहुल यांच्या सोबत कन्याकुमारीपासून असलेले भारत यात्रीही चालायला लागतात. यात्रे दरम्यान स्थानिक कार्यकर्ते, नागरिकही यात्रेमध्ये सामील होतात.
– रस्त्याच्या कडेला उभे असलेले किंवा ताफ्यात घुसू पाहणार्यांची तळमळ, भेटीची ओढ पाहून राहुल त्यांना बोलावून घेतात किंवा अचानक जवळ जातात त्यांची आस्थेने चौकशी करतात. चालता-चालता विविध क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करतात.