“ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही” – अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


विधीमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय… ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

अशाप्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या परिसरात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून तातडीने पाऊले विधानसभा अध्यक्षांनी व मुख्यमंत्र्यांनी उचलली पाहिजे असे सांगतानाच जोडे मारण्याच्या घटनेचा तीव्र निषेध जित पवार यांनी यावेळी केला.

अधिवेशन व्यवस्थित चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित सुरू होते. मात्र आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी एक बॅनर घेऊन बसले होते. त्यावर कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा फोटो होता. त्या फोटोला जोडे सत्ताधारी आमदार विधीमंडळाच्या कार्यक्षेत्रात मारत होते. हे विधीमंडळ अध्यक्ष व सभापती यांच्या अखत्यारीत येते. अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री आज कॉंग्रेस नेत्यांबद्दल अशाप्रकारची गोष्ट सत्ताधारी आमदारांकडून घडली आहे.

उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल. प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुमच्या पक्षांचा नेत्यांचा अभिमान आहे तसा आम्हालाही आमच्या नेत्यांचा अभिमान आहे. अशी जोडे मारण्याची पध्दत विधीमंडळ आवारात सुरू झाली तसे दुसर्‍या कुणाच्या तरी फोटोला जोडे मारले तर कुणालाच आवडणार नाही आणि आम्हालाही ते पटणार नाही असेही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.


Back to top button
Don`t copy text!