दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । मुंबई । गोरखपूरमधील गीता प्रेसला 2021 सालाचा ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार आहे. 1995 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शांना आदरांजली म्हणून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. जयराम रमेश यांच्या या ट्विटमुळे काँग्रेस पक्ष नाराज असल्याची माहिती आहे.
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्यास जयराम रमेश यांनी विरोध केला आहे. त्यांनी गीता प्रेसला मिळालेल्या गांधी शांतता पुरस्काराची तुलना सावरकर आणि गोडसेशी केली आहे.
जयराम रमेश यांच्या ट्विटवर काँग्रेस नाराज
जयराम रमेश यांनी ट्विट केले की, “2021 चा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर येथील गीता प्रेसला देण्यात आला आहे. ते यावर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. अक्षय मुकुल यांनी 2015 मध्ये महात्मा गांधींबद्दल लिहिले होते. त्यांचे वादळी संबंध, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंडांवर त्यांच्याशी सुरू असलेल्या लढाया. हा पुरस्काराचा निर्णय म्हणजे, गोडसे आणि सावरकरांना पुरस्कार देण्यासारखा आहे.”
दरम्यान, जयराम रमेश यांच्या ट्विटमुळे काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, जयराम रमेश यांचे गीता प्रेसबाबतचे वक्तव्य अनावश्यक आहे. हिंदू धर्माच्या प्रचारात गीता प्रेसचा मोठा वाटा आहे. जयराम रमेश यांनी असे विधान करण्यापूर्वी अंतर्गत चर्चा करायला हवी होती.
गीता प्रेसला 100 वर्षे पूर्ण
गोरखपूर येथील गीता प्रेसची स्थापना 1923 साली झाली. गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता पुस्तकांसह 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने कधीही पैसे मिळवण्यासाठी आपल्या प्रकाशनांच्या जाहिराती घेतल्या नाहीत.
गांधी शांतता पुरस्कारासोबतच गीता प्रेसला एक कोटी रुपयांचा मानधन देण्यात येणार आहे. मात्र गीता प्रेस व्यवस्थापनाने एक कोटीचे मानधन स्वीकारण्यास नकार दिला आहे. असे गीता प्रेसचे व्यवस्थापक डॉ.लालमणी तिवारी यांनी सांगितले.