स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 10 : भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चीनला इशारा दिला आहे. चीनने हे लक्षात ठेवावे, की आता 2020 आहे, 1962 नाही. आज भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या धाडसी नेतृत्वाकडे आहे. भारताकडे वाईट नजरेने बघणार्यांनो उरी आणि बालाकोटमध्ये काय अवस्था झाली ती पाहावी, असेही त्यांनी सांगितलेे.
हिमाचल प्रदेशात जनसंवाद व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल, पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. आज 2020 चा भारत आहे. 1962 चा नाही. भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे, काँग्रेस नेत्यांच्या हातात नाही. भारताला 1962 च्या लढाईत चीनकडून हार पत्करावी लागली होती. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत-चीन यांच्या सैन्यातील तणावावर भारताला 1962 च्या युद्धाची आठवण करून दिली. दोन्ही देशाच्या पातळीवर लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर तणाव कमी करण्यासाठी सैन्यस्तरीय चर्चा सुरू आहे. 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल पातळीवर चीनची आक्रमकता कमी झाली पण ते जुन्या स्थितीत परतण्याच्या मानसिकतेत नाही. काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी सरकारला चीन सीमेवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधी हीच व्यक्ती आहे जी बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागत होती. चीनच्या मुद्द्यावर ट्विटरवरून प्रश्न विचारू नयेत, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही हे राहुल गांधींना समजायला हवे. राहुल गांधींनी बालाकोट एअरस्ट्राइक आणि 2016 च्या उरी हल्ल्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
लेफ्टनंट जनरल नितीन कोहली, लेफ्टनंट जनरल आर. एन. सिंह आणि मेजर जनरल एम. श्रीवास्तव यांच्यासह लष्कराच्या 9 माजी अधिकार्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला दुर्दैवी म्हणणारे निवेदन जारी केले होते. दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावर किरेन रिजिजू यांनी जोरदार पलटवार केला आहे. जेव्हा राजकीय फायदा हा राष्ट्रहितापेक्षा मोठा वाटू लागतो तसेच कुणी व्यक्ती स्वतःच्या देशाच्या लष्करावर विश्वास ठेवणे बंद करतो, तेव्हा अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली जातात. अपेक्षा करतो, की कुणीतरी 1962 मध्ये केलेल्या चुकांचे आत्मचिंतन करेल अशी बोचरी टीका रिजिजू यांनी केली.