
दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । महाराष्ट्र निर्मितीचे ६५ वे वर्ष साजरे होत असताना, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्यामुळे गेल्या ६५ वर्षात महाराष्ट्राची झालेली सर्वांगीण प्रगती आणि महाराष्ट्राची संस्कृती तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ एप्रिल ते दि. ४ मे दरम्यान गौरव महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र गौरव यात्रेचे फलटण येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, माजी सभापती रामभाऊ ढेकळे,अशोकशेठ सस्ते, बाळासाहेब खलाटे, बाबा भोई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
या गौरव यात्रेचा एक भाग म्हणून राज्याच्या ६ महसूल विभागातून गौरव रथ यात्रा सुरु केली आहे, मुंबईत ह्या सर्व गौरव रथ यात्रा पोहोचल्यानंतर तेथे मोठा गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगताना गौरव यात्रेतील कलशांमध्ये छ. शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या राज्यातील गड किल्ल्यांवरील आणि महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्यांच्या गावातील माती तसेच महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या नद्यांचे पाणी मोठ्या २ कलशांमध्ये गौरव यात्रे दरम्यान संकलित करण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
कराड येथे गौरव यात्रेचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले, त्यावेळी प्रीती संगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृती स्थळ येथे जाऊन अभिवादन केल्यानंतर सातारा शहरात, नंतर वाई, कवठे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव, तेथून स्वराज्याची पहिली लढाई झालेल्या सुभान मंगल किल्ला असलेल्या शिरवळ, तेथून माऊलींच्या आळंदी – पंढरपूर आषाढी वारी दरम्यान मुक्कामाचे प्रमुख ठिकाण असलेल्या लोणंद येथून छ. शिवाजी महाराज यांची सासुरवाडी, राणीसाहेब छ. सईबाई महाराज यांचे माहेर आणि धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या ऐतिहासिक नगरी फलटण मध्ये गौरव यात्रेचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत झाल्याबद्दल ना. मकरंद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडला, महाराष्ट्राने केलेली सर्वांगीण प्रगती नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या गौरव यात्रेत सहभागी होण्याची संधी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. मकरंद पाटील, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. नितीन पाटील व मतदार बंधू – भगिनी यांच्यामुळे आपल्याला मिळाली, यात्रेत सहभागी होता आले, आपण स्वतःला भाग्यवान समजतो असे सांगून आ. सचिन पाटील यांनी गौरव यात्रा व त्यामधील नेते कार्यकर्त्यांचे फलटण मध्ये स्वागत केले.
गौरव यात्रेचे शहराच्या प्रवेशद्वारी जिंती नाका येथे आगमन झाल्यानंतर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ. सचिन पाटील व सहकाऱ्यांनी यथोचित स्वागत केले. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या संयुक्त पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छ. शिवरायांच्या सासुरवाडी फलटण येथील पवित्र मातीचा कलश श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, डी. के. पवार, रामभाऊ ढेकळे व अन्य मान्यवरांनी ना. मकरंद पाटील यांच्या कडे सुपूर्द केला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महाराष्ट्र गौरव यात्रा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली आहे.
ना. मकरंद पाटील यांची आ. सचिन पाटील व राहुल निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आ. सचिन पाटील व राष्ट्रवादीचे फलटण शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आगामी काळामध्ये राष्ट्रवादीच्या तळागळात काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भरीव ताकद देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी आवर्जून सांगितले.