हा तर लोकशाहीचा गळा घोटणारा निर्णय : केशव उपाध्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २२ : आपत्तीकाळात विरोधी पक्षासकट सर्वांना बरोबर घेऊन जाण्याऐवजी विरोधी पक्ष नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकांवर निर्बंध घालण्याचा सरकारचा निर्णय लॊकशाहीवर घाला घालणारा आहे  अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. या निर्णयाद्वारे सरकार लोकभावनांना चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे ,  असेही श्री . उपाध्ये यांनी म्हटले आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे गेल्या काही दिवसांत राज्याचा दौरा करून कोरोना महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चालू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. आपल्या दौऱ्यात या दोघा नेत्यांनी सरकारी रुग्णालयांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली आहे. सर्व संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली. या दौऱ्यात लोक मोठ्या आशेने विरोधी पक्षांकडे पहात होते. त्यांच्या दौऱ्यामुळे  लोकांना दिलासा मिळत होता. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती वास्तवाकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्षही वेधले होते.

उपाध्ये यांनी म्हटले आहे की, या काळात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यभर दौरे करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्री मुंबईतही हिंडण्याचे धाडस दाखवीत नाहीत. अशा स्थितीत उपाययोजनांचा आढावा घेणे व त्यातील त्रुटी सरकारला दाखवून देणे हे विरोधी पक्ष नेत्यांचे कर्तव्य आहे. श्री. फडणवीस व श्री. दरेकर यांच्या दौऱ्यांमुळे आपले अपयश जनतेपुढे येऊ लागल्याची भीती मुख्यमंत्र्यांना वाटू लागली असावी. त्यामुळेच लोकशाहीवर आघात करणारा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला आहे.

या आपत्तीकालात राजकारण बाजूला ठेऊन सर्वांना सोबत घेऊन जायच्या ऐवजी राज्यातील सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांवर  बंदी घालण्याचा प्रयत्न करीत आहे हे लोकशाही विरोधी असून जनतेच्या दरबारात याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री. उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!